पंढरपूर : एखाद्या चित्रपटातील दृष्याप्रमाणे पंढरपूरनजीक असलेल्या लक्ष्मी टाकळी या गावात सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास अपहरणाची घटना घडली. दुचाकी व जीपमधून आलेल्या सहा जणांनी गाडीतून येऊन आपल्या पतीला उचलून घेऊन गेल्याची तक्रार अनिता बंडू शिंदे या महिलेने पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात मंगळवारी दिली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनिता बंडू शिंदे (वय ४२, रा.टाकळी रोड प्रतिभाताई नगर, लक्ष्मी टाकळी, ता.पंढरपूर) यांचे टाकळी रोड माळीवस्ती सुहासनी दुग्धालयाशेजारी शिवपार्वती किराणा दुकान आहे. या दुकानासमोरुन सोमवारी रात्री २ मोटारसायकलीवरून आलेले चौघे इसम व काळ्या रंगाच्या जीपमधून दोघे आले. या सहा जणांनी पैशाच्या कारणावरून अनिता यांचे पती बंडू ज्ञानोबा शिंदे (वय ४६, रा. प्रतिभाताई नगर, टाकळी रोड, पंढरपूर) यांना जबरदस्तीने पळवून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात भा.दं.वि.क ३६५,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपहरणकर्त्यांनीच आणून सोडले
अनिता शिंदे यांनी पतीचे अपहरण झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली. यानंतर काही वेळाने अपहरणकर्त्यांनीच बंडू शिंदे यांना बुधवारी दुपारी चार वाजता घराजवळ आणून सोडले.
------