सोलापूर : घरातील सोने दे नाही तर बाळ मारून टाकेन अशी धमकी देत बाळाला बाहेर घेऊन गेले. १ लाख ६८ हजार रुपयांचे गंठण व मंगळसूत्र असे चार तोळे सोने हातात पडताच बाळ ताब्यात देत चोरटे बाहेरून कडी लावून पसार झाले.
सर्वसामान्यांच्या मनात धडकी भरवणारी ही घटना आहे बीबी दारफळ (ता. उत्तर सोलापूर) मधील. शुक्रवारी पहाटे पावणेदोनच्या दरम्यान अवघ्या १० मिनिटात साठे वस्तीवर ही घटना घडली.
बीबीदारफळ परिसरात गेल्या काही दिवसांपासून चो-याचे सत्र सुरू आहे. चोरटे मात्र पोलिसांना सापडत नाहीत. शुक्रवारी रात्री ह.भ.प. वसंत साठे महाराज यांच्या घरात चोरटे शिरले. सून सोनम ही ११ महिन्याच्या बाळासाठी पाणी आणत असताना एकाने फडक्याने तोंड दाबले. गळ्यातील व कपाटातील सोने दे... नाहीतर बाळ मारून टाकेन, असे धमकावत दुसरा साथीदार बाळाला बाहेर घेऊन गेला. तो शेजारच्या द्राक्षबागेत थांबला. गळ्यातील व कपाटातील चार तोळे दागिने हातात पडताच बाळ टाकून निघून गेले. सोलापूर तालुका पोलिसांत याची नोंद झाली आहे.
२७ जून रोजी मीराबाई भीमराव साठे यांचे बंद घर फोडून अडीच तोळे सोने, मोहन भीमराव साठे यांच्या घरातील सोने, खेलबा वाघमोडे यांच्या घरातील लहान मुलांचा पैशाने भरलेला गल्ला व कागदाची पिशवी घेऊन चोरटे पसार झाले. मागील दोन महिन्यांत आठ ते १० शेतकऱ्यांच्या मोटारीच्या केबल चोरट्यांनी लांबविले.
तलावातील मोटारीच्या सतत चोऱ्या होत असतात. शीतल गुरुदेव निकम या महिलेचे किराणा दुकान फोडून रोख रक्कम व दुकानातील साहित्य चोरले.
--
सीसीटीव्ही असूनही...
चोरटे सतत चोरट्या करतात. पोलीस येतात अन् सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद द्या असे सांगतात. फिर्याद देऊनही काहीच उपयोग होत नाही. २७ जूनच्या रात्री चार घरफोड्या झाल्या. सीसीटीव्हीत चौघे चोरटे दिसतात. शीतल निकम यांच्या दुकानातील चोरीचेही सीसीटीव्ही आहे. मात्र पोलिसांना चोरटे सापडत नाहीत.