लोकमत न्यूज नेटवर्क
माढा : येथील न्यायालयाच्या इमारतीमागे एका स्टँप व्हेंडरच्या घरात चोरटे शिरले. एका चोरट्याने त्यांच्या मुलीच्या गळ्याभोवती चाकू लावत साथीदारांना म्हणाला...फक्त सोने घ्या, चांदी नको. त्यांनी चक्क ७ लाख ६१ हजारांचे दागिने आणि मोबाईल घेऊन तेथून धूम ठोकली. शुक्रवारी पहाटे घडलेल्या घटनेेने या परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
अमरदीप दिगंबर भांगे या स्टँप व्हेंडरच्या घरी जबरी चोरीचा प्रकार घडला. याबाबत अमरदीप यांची मुलगी अमृता प्रशांत जगताप (वय ३६) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलीस सूत्रांकडील माहितीनुसार भांगे कुटुंबीय गुरुवारी रात्री जेवण आटोपून झोपी गेले होते. बेडरुममध्ये अमरदीप तर दुसऱ्या खोलीत विवाहित मुलगी अमृता ही स्वत:च्या मुलाला आणि आईला घेऊन झोपी गेल्या होत्या. शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास चौघे चोरटे जिन्यात आले. जिन्याचा दरवाजा उघडून घरात प्रवेश केला. ते अमृताच्या खोलीत आले. त्यांच्या आवाजाने कुटुंब जागे झाले. इतक्यात एकाने स्वत:जवळचा खटक्याचा चाकू काढला आणि अमृताच्या गळ्याभोवती लावत... हिलो मत म्हणाला.
आम्ही तुम्हाला मारणार नाही, तुमचे दागिने आम्हाला द्या...म्हणत त्याने तिघांना दागिने शोधायला सांगितले. यावेळी चोरट्यांच्या प्रमुखाने ...सिर्फ सोना लो... बाकी कुछ नही म्हणत साथीदारांना सूचना केली. त्यांनी चांदी तशीच ठेवत कपाटातून केवळ दागिने काढून घेतले.
चार तोळे पाटल्या, पाच तोळ्याचे गंठण ,चार तोळे बांगड्या, पाच तोळे लॉकेट, दोन तोळ्याचे मिनी गंठण, कर्णफुले, बदाम, कळस व एक मोबाईल असा एकूण सात लाख ६१ हजार रुपयांचा ऐवज घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. या घटनेनंतर अमृता यांनी माढा पोलिसांशी संपर्क साधला. पोलीस उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमूल कादबाने, पोलीस उपनिरीक्षक किरण घोंगडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी लागलीच श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण केले. मात्र श्वान थोड्या अंतरावर जाऊन घुटमळत राहिले.
---
अर्धा तास रंगला थरार
या घटनेपूर्वी मागील आठवड्यात शहरातून भरदिवसा तीन मोटरसायकली पळवल्या आहेत. याचा तपास अद्याप लागलेला नाही. दरम्यान शुक्रवारी जबरी चोरीचा प्रकार घडला आणि या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले. चोरट्यांचा संवाद, कपाट उघडून दागिने काढून घेणे, चाकूच्या धाकाखाली ठेवत कुटुंबाला हलू न देणे हा खेळ जवळपास अर्धा तास रंगला होता. या अर्धा तासातील संवादावरुन अमृता यांनी पोलिसांपुढे चोरट्यांविषयक वर्णन मांडले.
----
फोटो : ०८ माढा
स्टँप व्हेंडर भांगे यांच्या घरातून दागिने काढून घेत साहित्य अस्ताव्यस्त टाकून दिले.