शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास फिरोज पठाण यांच्या घरात चोरटा शिरला. फिरोज पठाण यांच्या आईचे निधन झाल्याने दहाव्या दिवसाच्या कार्यक्रमासाठी पाहुणे आले होते. मुलगी आयेशाही आली होती. तिचा लहान मुलगा रडू लागल्याने त्याला दूध पाजण्यासाठी आयेशा उठली. तिला घराचा दरवाजा उघडा दिसला. तिने भाऊ आरबाजला उठविले. आरबाजला एक व्यक्ती पैसे मोजत असल्याचे दिसले. आरबाज त्याला पकडू लागला, मात्र त्याने उडी मारली. पळताना त्याचा चाकू तेथेच राहिला. बाहेर हत्यारासह तिघे दुचाकी घेऊन थांबले होते. चौघेही गाडीवर पळालेले आरबाजने पाहिले.
चोरटे दोन मोबाइल व एक हजार रुपये घेऊन गेले होते. आरबाजने चोरटे घेऊन गेलेल्या मोबाइलवर संपर्क साधला असता चोरट्याने माझा चाकू तुझ्या घरात राहिलाय असे सांगितले. घेऊन जा असे आरबाज म्हणताच तू मारतो का? असे चोरटा म्हणाला.
----
चोऱ्या थांबेनात, चोरटे पकडेनात
मागील महिन्यात बीबीदारफळ येथे अनेक कुटुंबांच्या चोऱ्या झाल्या. चोर पकडायचा प्रयत्न पोलिसांनी केला नाही. त्यानंतर कोंडी, गुळवंची व कारंबा गावातही चोऱ्या झाल्या. घरातील चीजवस्तू व जनावरे चोरी जात आहेत. पोलिसांना मात्र चोरटे सापडत नाहीत. आम्ही तर कुठे चोर शोधायचे, असे पोलीस म्हणाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.