बाळासाहेब बोचरेसोलापूर: पाऊस नसल्याने हवालदिल झालेल्या शेतकºयांना हुमणी किडीने अधिक संकटात टाकले असून, शेतकºयांचे झालेले नुकसान भरून काढणे अवघड असले तरी पुढे होऊ नये, यासाठी शेतकºयांनी एकात्मिक कीड नियंत्रणावर भर देण्याची गरज आहे, असे डॉ. पांडुरंग मोहिते यांनी सांगितले. कोल्हापूरच्या राजर्षी छत्रपती शाहू कृषी महाविद्यालयात अखिल भारतीय कृषी संशोधन केंद्राचा प्रकल्प असून, त्यामध्ये डॉ. मोहिते हे कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ आहेत. याबाबत त्यांच्याशी केलेली बातचीत.
प्रश्न: ही कीड अचानक कधी नव्हे इतकी उद्भवली कशी?डॉ. मोहिते: याला ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम म्हणता येईल. ग्लोबल वॉर्मिंगमुळे यंदा पावसाचे गणित बिघडले आहे. ज्यावेळी धो-धो पाऊस पडतो, पाणी साठते तेव्हा मातीमधील हुमणी मरून जाते. पण अल्पसा पाऊस पडतो तेव्हा मातीमधील ही कीड बाहेर येते आणि झाडाझुडपांवर ती मोठी होते. त्याच ठिकाणी नर-मादीचे मिलन होते आणि मादी जमिनीत जाऊन अंडी घालते. एकावेळी ५५ ते ६५ अंडी ही मादी घालते. त्यापासून जन्मलेल्या या अळ्या जमिनीतील सेंद्रिय पदार्थ खाऊन टाकतात. खरीप असो वा रब्बी त्यामुळे पिकाच्या मुळ्या पोखरल्याने रोपांची संख्या कमी होते व अपेक्षित उत्पन्न येत नाही.
प्रश्न: याला तातडीची उपाययोजना काय करता येईल?डॉ. मोहिते: वास्तविक ही कीड मातीत आहे. पिकाचे नुकसान झाल्यावर ही कीड असल्याचे कळते. त्यामुळे तिच्यावर कीटकनाशकांचा मारा करणे अवघड आणि किचकट आहे. झालेले नुकसान भरून काढता येत नाही, तरीही पिकांचे महत्त्व ओळखून उर्वरित पीक वाचवायचे असेल तर एकरी पाच ते सहा हजार रुपये खर्चात नियंत्रण करणे शक्य आहे. जेथे सरीमध्ये पाणी साठवणे शक्य आहे तेथे पाणी साठवले की मातीमधील कीड मरून जाते. पण सरीमध्ये पाणी जात नसल्याने कीड लागलेल्या रोपाच्या मुळाजवळ खड्डे पाडून १०० ग्रॅम बेटॅरायझम बुरशी किंवा सूत्रकृमी पॉवर १५ लिटरच्या पंपात टाकून ढवळावी. पंपाचा नोझल काढून मुळाजवळच्या खड्ड्यात सोडावी किंवा पहारीच्या साहाय्याने मुळाजवळ सूर मारायचा आणि त्यामध्ये क्लोरोपायरीफॉस ५० टक्के प्रवाही एक लिटर किंवा फ्ल्यूबेंड्यामाईड २५० मिली किंवा क्लोथायोनिडीन २५० ग्रॅम किंवा इमिडा आणि फिप्रोनील यांचे संयुक्त कीटकनाशक १६० ग्रॅम यापैकी एक ४०० लिटर पाण्यात मिसळून तुंबलेल्या पाण्यावर तवंग सोडावा.
प्रश्न: हुमणी होणार नाही यासाठी काय करावे?डॉ. मोहिते- पुढील वर्षी पाऊस असाच झाला तर हुमणीचे संकट हे यापेक्षा अधिक होणार आहे. त्यासाठी आताच उपाययोजना करणे आवश्यक आहे. हुमणीच्या बंदोबस्तासाठी सूत्रकृमी पावडर तयार करण्यात येत आहे. मात्र मागणीच्या प्रमाणात पुरवठा होऊ शकत नसल्याने बेंगलोरच्या एका प्रयोगशाळेशी याबाबत करार करण्यात आला आहे. त्यामुळे हुमणी नियंत्रणात येण्यासाठी उपाययोजना होतील. ------------------------------काय कराव्यात उपाययोजना
- आज मिळणारे सर्व भुंगे शेतकºयांनी एकत्रितपणे नष्ट करावेत.
- नवीन पिकाची लावणी करण्यापूर्वी शेतात पाणी अडवून त्यावर तवंग सोडावा. त्याला आळवणीही म्हणतात.
- नवीन ऊस लावताना जो खताचा डोस देतो त्या डोसमध्येच फ़ोरेट किंवा फिप्रनील किंवा रेनाक्झीपायर किंवा डर्सबान यांचे दाणेदार एकरी १० किलो मिसळावे व जमिनीत टाकावे. नंतर लागण करावी.