पंढरपूर : भीमा नदीच्या पैल तीराशी पंढरपूरला जोडणारे सध्या दोन मोठे पूल असले तरीही शहरातून होणारी जड वाहतूक प्रशासनाची डोकेदुखी ठरली आहे. शिवाय यात्राकाळात वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होते. आता त्यापेक्षाही मोठा तिसरा पूल उभा केला जात आहे. चार पदरी पुलानंतर महापूर आला तरी पंढरीचा इतर भागाशी संपर्क कायम राहण्यास मदत होणार आहे.
३१ डिसेंबर रोजी या पुलाचे भूमिपूजन प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते झाले. हा पूल अवघ्या एक वर्षात पूर्ण करण्याचा संकल्प प्रशासनाने केला आहे. त्यामुळे भाविक आणि वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पंढरपूर तालुक्यातून वाहणाऱ्या भीमा नदीवर सध्या चार पूल आहेत. त्यापैकी तीन पूल पंढरपूर येथे, तर एक व्होळे-कौठाळीदरम्यान आहे. मात्र या चारही पुलांची उंची कमी असल्याने भीमा नदीला पूर आला की ते पाण्याखाली जातात. या काळात पंढरपूरचा सोलापूर, अहमदनगरसह मराठवाडा, विदर्भाशी असलेला संपर्क तुटतो. या पार्श्वभूमीवर पुलाची उंची वाढवण्याची मागणी होती.
---
५२५ मीटर लांबीचा पूल
मोहोळ-पंढरपूर-पुणे-आळंदी हा राष्ट्रीय महामार्ग (क्र. ९६५) याच भागातून गेला आहे. या महामार्गासाठी नवीन पुलाची आवश्यकता निर्माण झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग बायपासकरिता गुरसाळे-कौठाळीदरम्यान हा नवीन पूल उभा राहत आहे. या पुलाची रुंदी चार पदरी ( ३२ मीटर) तर लांबी ५२५ मीटर इतकी आहे. रुंदीने आणि उंचीच्या बाबतीत यापूर्वी अस्तित्वात असलेल्या पुलांच्या तुलनेत हा पूल उंच, लांब आणि रुंद असणार आहे. महापूर आला तरीही या पुलामुळे वाहतूक विस्कळीत होणार नाही. यात्रा कालावधीत निर्माण होणारा वाहतुकीचा प्रश्न सुटणार आहे. पंढरपूरमधून होणारी जड वाहतूक रोखता येणार आहे.
---
१०९ एकर जमीन संपादित
हा नवीन मार्ग आळंदी - पंढरपूर या पालखी मार्गावरून वाखरी एमआयटीजवळून जातो. पुढे शिरढोण, कौठाळी, गुरसाळे, पाखालपूरमार्गे पंढरपूर-मोहोळ मार्गाला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गाच्या दोन्ही बाजूच्या जमिनीच्या किमती वाढतील. या पुलाभोवताल नवनवीन उद्योग व्यवसायात सुरू होणार आहे. त्यामुळे रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण होतील. या पुलासाठी मोहोळ आणि पंढरपूर तालुक्यात १९ गावांतून १०९ एकर जमीन संपादित करण्यात आली असून, संबंधित शेतकऱ्यांना ८५ टक्के मोबदला देण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
----
फोटो : ३१ पंढरपूर
गुरसाळे येथे नदीवर बांधण्यात येत असलेल्या सर्वात मोठ्या पुलाचे भूमिपूजन करताना प्रांताधिकारी सचिन ढोले.