राजकुमार सारोळे
सोलापुर : झेडपीत सत्ता स्थापनेसाठी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरस सुरू असतानाच संख्याबळाचे गणित जुळविण्यासाठी तिसरी आघाडी स्थापण्याचा पर्याय समोर आला आहे. याची जबाबदारी आमदार संजय शिंदे यांच्यावर देण्यात आली असून, नागपुरात यावर चर्चा झाल्याचे विश्वसनीय सूत्राने सांगितले.
करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची भेट झाली. या भेटीत भाजपच्या पूर्वीच्या प्रस्तावावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. पूर्वी जर तुम्ही समविचारी आघाडीबाबत शब्द दिला असेल तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून निर्णय घ्या, असा सल्ला पवार यांनी दिल्याचे सूत्राने सांगितले. आमदार प्रशांत परिचारक यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांची भेट घेऊन झेडपीतील सत्ता स्थापनेबाबत चर्चा केली आहे.
मोहिते-पाटील यांनी शेकापला सोबत घ्या, असा सल्ला दिला. माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, गणपतराव देशमुख आणि मोहिते-पाटील यांच्यात याबाबत बोलणे झाल्याचे सांगण्यात येत आहे. माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तम जानकर यांनीही याबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यावेळी पवार यांनी झेडपीत राष्ट्रवादीची सत्ता स्थापन करण्यासाठी पुढकार घ्या, अशा सूचना दिल्या आहेत.
इकडे नागपुरात आमदार विजयकुमार देशमुख यांचे आमदार संजय शिंदे, आमदार राजेंद्र राऊत, माजी खासदार रणजितसिंह मोहिते—पाटील यांच्यात झेडपीतील सत्ता स्थापनेबाबत गुप्तगू झाल्याची चर्चा आहे. झेडपीत सत्ता स्थापनेची सूत्रे उपाध्यक्ष पदावरून हलू लागली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपाध्यक्षासाठी इच्छुकांची अर्धा डझन नावे समोर आली आहेत. माजी आमदार राजन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेऊन चिरंजीव बाळराजे यांच्यासाठी आग्रह धरल्याचे सांगण्यात आले. आमदार शिंदे यांची पुतण्या रणजित शिंदे यांना उपाध्यक्ष करण्याची इच्छा आहे. शेकापचे सचिन देशमुख यांनी मोठे पद मिळावे म्हणून प्रस्ताव मांडला आहे. सत्ता स्थापनेसाठी भाजप व राष्ट्रवादीकडे २८ चे संख्याबळ जुळत आहे. आणखी ७ जणांचे गणित जुळविण्यासाठी आघाडीतील सदस्यांना सोबत घेणे गरजेचे आहे. हे गणित फक्त आमदार संजय शिंदे हेच करू शकतील, असे सर्वांना वाटत आहे.
आमदार परिचारक यांनीही त्यांच्याकडेच ही जबाबदारी द्यावी, असे सुचविले आहे. राष्ट्रवादी, शिवसेनेमध्ये गटाचे सदस्य आहेत. त्यामुळे पक्षादेश दिल्यावर सर्वांचीच अडचण होणार आहे. एकूण ही त्रांगडी स्थिती पाहता आघाडीतील सदस्य या दोन्ही पक्षांबरोबर जाण्यापेक्षा तिसºया आघाडीला पसंती देतील, असे चित्र दिसत असल्याचे विजयराज डोंगरे यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी मात्र या स्थितीवर भाष्य करणे टाळले आहे.
म्हेत्रे ठरणार निर्णायक- विधानसभा निवडणुकीत माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांना भाजपकडून दणका बसला. त्यामुळे समविचारी आघाडीत त्यांचे सदस्य येणार नाहीत हे उघड आहे. म्हेत्रे आणि सुरेश हसापुरे यांनी चर्चा करून ११ सदस्यांचा एक गट तयार केला आहे. त्यामुळे भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी या गटाची मदत घ्यावी लागणार हे उघड आहे. या दोन्ही पक्षांबरोबर ते न आल्यास तिसºया आघाडीची सत्ता हाच पर्याय राहील.