सोलापूर : स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून विकसित करण्यात येत असलेले स्मार्ट रंगभवन चौकाचे उद्घाटन २० नोव्हेंबर रोजी होईल, असे सोलापूरस्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या वतीने सांगण्यात आले होते. परंतु, अद्यापही चौकातील आणखी काम शिल्लक असल्याचे सोमवारी सायंकाळी पाहायला मिळाले.
स्मार्ट सिटी योजनेतून रंगभवन चौकात पब्लिक प्लाझा साकारण्यात येत आहे. जुलै २०१८ ही कामाची अंतिम मुदत होती. ठेकेदाराने कामासाठी मुदतवाढ घेतली. स्मार्ट सिटी कंपनीने ठेकेदाराला दोन वेळा दंड ठोठावला आहे. २० नोव्हेंबरपर्यंत काम पूर्ण करु, असे ठेकेदाराने कंपनीला सांगितले होते. दोन दिवसांपूर्वी जनरेटरच्या सहाय्याने प्लाझामध्ये बसविण्यात आलेल्या रंगीबेरंगी दिव्यांची चाचणी घेण्यात आली. सध्या तीनही बाजूच्या आयलँडचे काम करण्यात येत आहे. हे काम पूर्ण होण्यास आणखी एक आठवडा लागेल. प्लाझामधील इतर कामेही अद्याप करायची आहेत, असे ठेकेदाराच्या प्रतिनिधीकडून सांगण्यात आले.
दरम्यान, हे काम पूर्ण होत आल्याने महापालिकेच्या पदाधिकाºयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या चौकाचे उद्घाटन करण्याची तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्र्यांची वेळ घेण्याच्या नादात चौकाच्या उद्घाटनाला आणखी विलंब होईल. रंगभवन हा अत्यंत वर्दळीचा चौक असून अर्धवट कामामुळेच या चौकात विस्कळीतपणा आला आहे. वाहतुकीसही अडथळे होत आहेत. त्यामुळे हे काम तातडीने पूर्ण करून चौकाला स्मार्ट करावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.