आप्पासाहेब पाटील
सोलापूर : एकीकडे स्मार्ट सोलापूर... रेल्वेचे विस्तारलेले जाळे... हायवेचे मोठे जाळे...अशा मोठमोठ्या बाता मारणाऱ्या सोलापुरात साध्या साध्या गोष्टीसाठी नागरिकांना मोठमोठ्या यातना सहन कराव्या लागत आहेत. चांगलं जीवन जगणाऱ्या माणसाचा शेवटचा प्रवास हा धक्कादायक होत असल्याची अनेक उदाहरणे सोलापुरात दिसून येतात. दुचाकीच्या फोकसमध्ये मृतदेहावर सोरेगाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याची वेळ कुटुंबीयांवर आल्याचा असाच प्रकार रविवारी रात्रीच्या सुमारास घडला. या प्रकारामुळे नातेवाइकांनी महापालिकेच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
सोलापूर महापालिकेचे माजी सेवानिवृत्त कर्मचारी यल्लप्पा मग्रुमखाने यांचे रविवारी अल्पशा आजाराने वयाच्या ६० व्या वर्षी निधन झाले. मग्रुमखाने कुटुंबीय गेल्या कित्येक वर्षांपासून सोरेगाव येथे राहण्यास आहेत. त्यामुळे सोरेगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार होते. अंत्यसंस्कारासाठी शेकडो लोक उपस्थित होते. जेव्हा यल्लप्पा मग्रुमखाने यांचा मृतदेह सोरेगाव स्मशानभूमीत आणण्यात आला तेव्हा स्मशानभूमीत पथदिव्यांची व्यवस्थाच नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पथदिवे बंद असल्याने मृत यल्लप्पा मग्रुमखाने यांच्या मृतदेहावर दुचाकी लाइटच्या फोकसमध्येच अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. अंत्यसंस्कारावेळीची ही अवस्था पाहून मग्रुमखाने कुटुंबीयांसह मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहिलेल्या अनेकांच्या डोळ्यांत अश्रू पाहायला मिळाले.
अन्यथा तिरडी मोर्चा काढणार...
सोरेगाव स्मशानभूमीत सोलापूर महापालिका प्रशासनाकडून विद्युत कामांसह अन्य विकासकामांची सुधारणा न झाल्यास येणाऱ्या काही दिवसांत सोलापूर महापालिकेवर तिरडी मोर्चा काढू असा आक्रमक पवित्रा सोरेगाव येथील नागरिकांनी घेतला आहे. या हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेबाबत पालिका आयुक्त व संबंधित लोकप्रतिनिधींचा निषेध नोंदवत सोलापूरकर संताप व्यक्त करीत आहेत.