सोलापूर: ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वर यात्रा सुरू आहे. रविवारी रात्री उशिरा भाकणूकीचा कार्यक्रम झाला. या भाकणूकीत वासरू खूप घाबरले होते, बिथरले होते याचाच अर्थ म्हणजे कोणती तरी मोठी नैसर्गिक आपत्ती देशात येणार आहे, असं विश्लेषण महायात्रेतील प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी केले.
सोलापूरच्या सिद्धरामेश्वर यात्रेतील भाकणूक हा भविष्य वर्तवण्याचा पारंपरिक प्रकार आहे, यात्रेला येणाऱ्या हजारो भाविकांचा त्यावर विश्वास असतो, तो त्यांच्या श्रद्धेचा भाग आहे. होमविधीचा सोहळा पार पडल्यानंतर भाकणुक विधी पार पडला. सिध्देश्वर यात्रेत भाकणूकीला खुप मोठे महत्व आहे. ही भाकणूक ऐकण्यासाठी सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेशातील भाविक मोठया संख्येने उपस्थित होते. अक्षता सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी दिवसभर वासराला उपाशी ठेवले जाते. होमविधीचा सोहळा पार पडल्यानंतर वासराची भाकणुक होते. रविवारी मध्यरात्री वासराचा भाकणुक विधी पार पडला.
दरम्यान, यावेळी राजशेखर देशमुख यांनी वासराची पूजा केली. सुरूवातीलाच वासराने मूत्र आणि मल विसर्जन केले. यावरून भरपूर पाऊस पडणार असल्याचे भाकीत हिरेहब्बू यांनी केले. एवढेच नव्हे तर जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर राहणार आहे, असंही भाकित करण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारची महागाई होणार नाही.