लोकमत न्यूज नेटवर्क
बार्शी : फेसबुकवरील लाईव्ह पोस्टचा राग मनात धरून बेकायदा जमाव जमवून अन्न छत्रालयात घुसून साहित्याची तोडफोड केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिसांनी नगरसेवकासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान अटक केलेल्या सातही आरोपींना बार्शी न्यायालयात उभे केले असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. सबनीस यांनी तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
२ मार्च रोजी रात्रीच्या वेळी देवणे गल्लीत राजमाता इंदुताई आंधळकर अन्न छत्रालयात हा प्रकार घडला. याबाबत उशिरा सागीर रहीम सयद (३०, रा.शिवाजी आखाडा, बार्शी) यांनी तक्रार देताच पोलिसांनी नगरसेवक अमोल चव्हाण, चेतन चव्हाण, नाथा मोहिते, भगवान साठे, अतुल शेंडगे, रोहित अवघडे, प्रमोद कांबळे, बाबा वाघमारे (सर्व रा.लहुजी वस्ताद चौक, बार्शी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. यापैकी चेतन चव्हाण हा फरारी झाला तर इतर सात जणांना पोलिसांनी अटक केली.
भाऊसाहेब आंधळकर हे पाणीपट्टी व घरपट्टी विरोधात नगरपालिकेवर ५ मार्च रोजी मोर्चा काढून नगराध्यक्षांना चोळी बांगड्यांचा आहेर देणार अशी पोस्ट सोशल मीडियावर फिरली. नगरसेवक अमोल चव्हाण यांनी याचा मनात राग धरून त्याला प्रत्युत्तर देणारी पोस्ट टाकली. त्यावर आंधळकरांच्या कार्यकर्त्यांनी चव्हाण यांच्याविरोधात नवीन पोस्ट टाकली. याच राग मनात धरून २ फेब्रुवारी रोजी रात्री अन्न छत्रालयात घुसून हाणामारी केली. जखमी हे फिर्यादीसह अन्न छत्रालयात जेवणाचे पॅकिंग करीत होते. तसेच जवळच्या मुख्य रस्त्यावर जेवणाचे वाटप चालू होते. येथे आरोपीने येऊन मारहाण करून कार्यकर्त्यांना जखमी केले. तसेच अन्न छत्रालयात येऊन अन्नाची नासधूस केली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रेमकुमार केदार करत आहेत.