मंगळवेढा/मल्लिकार्जुन देशमुखे
वाळूची चोरी रोखण्यासाठी मंगळवेढ्याचे तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी कंबर कसली असून आता विना परवाना रॉयल्टी वाळू आढळल्यास त्या बांधकाम मालकास दंडात्मक कारवाईला समोर जावे लागणार आहे. यात एक ब्रास वाळूकरीता तब्बल ४० हजार रुपये दंड निर्धारित केला आहे. तहसीलदार स्वतः बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणावर जाऊन रॉयल्टीची पडताळणी करत आहेत. तलाठी, मंडल अधिकारी व पोलीस यांच्या १० जणांच्या पथकाने रविवार पासून मंगळवेढा शहरात कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.
सध्या जिल्ह्यात कुठेही वाळू लिलाव सुरू नाहीत तरीही तालुक्यात ग्रामीण व शहरी भागात मोठ्याप्रमाणात बांधकाम सुरू आहे. त्यासाठी नागरिक वाळू विकत घेत आहेत. वाळू विनारॉयल्टी नसावी, विनारॉयल्टी वाळू वापर दंडात्मक कारवाईस पात्र आहे. त्यामुळे नागरिकांनी वाळूची गौण खनिज नियमानुसार वाहतूक पावती (रॉयल्टी पास) घेऊनच वाळू खरेदी करावी, असे आवाहन तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी केले आहे.
बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या वाळूचे अवैध उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी अवैध मार्गाने विनारॉयल्टी विक्री, साठवणूक व खरेदी करणाऱ्यावर कारवाई करण्यात येणार आहे. .वाळू लिलाव बंद असताना ठिकठिकाणी वाळूचे ढिग ही स्थिती वाळू चोरीकडे दिशानिर्देश करीत आहे. रात्रीच्या सुमारास वाळूचोरी होत असल्याने प्रशासनसुद्धा हतबल झाल्याचे चित्र आहे.महसूल विभाग आता वाळू खरेदीच्या पडताळणीची कारवाई करणार असल्याने अवैध वाळू वाहतूक, चोरी व विक्रीवर आळा बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शेजारच्या तालुक्यातील वाळूमाफियांनी काही महिन्यापासून अक्षरश: धुडगूस घातला आहे.
महसूलच्या नियुक्त पथकाला चुकवून रात्री-अपरात्री वाळूचा अवैधरीत्या वाहतुक केली जात आहे. यामध्ये नुकताच एका पोलिसाला जीव द्यावा लागला आहे . वाळू चोरांचा रॉयल्टी नसतानाही हा गोरखधंदा सुरू आहे.यामध्ये शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.ही बाब निदर्शनास येत असल्याने तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी याला आळा बसण्यासाठी वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई चे सत्र सुरू केले आहे मागील काही दिवसात अनेक उपाय योजना आखल्या जात असून चोरीला आळा घालण्याचे काम केले जात आहे. अवैध वाळू उचल थांबविण्यास तातडीने वाळूचे लिलाव केले जाणे गरजेचे आहे.मात्र हे होत नसताना तूर्तास ही वाळू चोरी थांबविण्याच्या दृष्टीकोनातून उचललेल्या पावलाने वाळू चोरी रोखण्यास एक पाऊल पुढे पडले आहे------------------------------रॉयल्टी पावतीद्वारेच वाळू खरेदी करणे आवश्यक आहे. खरेदी केलेली वाळू, रितसर वाहतूक पावतीची मूळ प्रत विक्री करणाऱ्या कडुन प्राप्त करून ती जतन करावी व महसूल विभागाच्या नियुक्त पथकाद्वारे चौकशी झाल्यास वापर केलेल्या, साठविण्यात आलेल्या गौण खनिजाची वाहतूक पावती दाखवण्यात यावी, अन्यथा शासन नियमानुसार प्रति ब्रास पाचपट दंडाच्या तरतुदीनुसार ४० हजार रुपये याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. नंदुरबार येथील रॉयल्टी पावती वर सुद्धा वाळू खाली करण्याचे ठिकाण मंगळवेढा असेल तरच ती पावती ग्राह्य धरली जाणार आहे अन्यथा त्या वाळूवर ही कारवाई केली जाणार आहे, असे तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी सांगितले .