मोहोळ नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२१ साठी शहरात सर्वच पक्षाची जोरदार तयारी सुरु आहे. राष्ट्रवादीच्या ताब्यातील नगर परिषद खेचून घेण्यासाठी शिवसेनेने आपसातील मतभेद बाजूला ठेवून सर्व शिवसैनिकाची मोट बांधण्याची मोहीम सुरू केली आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी व शिवसेनेला शह देण्यासाठी एक महाविकास आघाडीची तयारी चालू आहे. आपली सत्ता अबाधित ठेवण्यासाठी राष्ट्रवादीने पुन्हा कंबर कसली आहे. यासाठी राष्ट्रवादीने गेल्या आठवडाभरात इच्छुकांचे पक्ष निधीसह अर्ज घेतले आहेत.
१७ प्रभागासाठी तब्बल ५३ इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज भरून दिले आहेत. राष्ट्रवादीकडून इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. पाच वर्षात नगर परिषदेला आलेला मोठ्या प्रमाणात निधी पाहता
सर्वच विद्यमान नगरसेवकांनी आपापल्या पक्षातून पुन्हा उमेदवारी मिळविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
राष्ट्रवादीचे पक्षनिरीक्षक नरेंद्र घुले यांच्या उपस्थितीत लवकरच या इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे यांनी यावेळी दिली.
----
कोणाला संधी मिळणार गुलदस्त्यात
नगर परिषदेचा कारभार करण्यासाठी नव्या इच्छुकांची ही गर्दी मोठ्या प्रमाणात सर्वच पक्षांमध्ये वाढली आहे.
परंतु वॉर्डनिहाय आरक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाल्याने अनेक विद्यमान नगरसेवकांचे वाॅर्ड आरक्षित झाले आहेत. त्यामुळे कोणत्या वाॅर्डात कोणत्या नगरसेवकाला संधी मिळणार की सर्वच पक्षांमध्ये नवीन चेहरे कोण येणार हे मात्र गुलदस्त्यात आहे.