सोलापूर : बाळे परिसरातील तीन, शेळगी परिसरातील 79 व देगाव परिसरातील तीन गट नंबरमधील मिळकत पत्रिका रद्द करण्यात आल्या होत्या. या भागातील नागरिकांना सातबारा आणि मिळकत पत्रिका काहीच मिळत नसल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. आता या भागातील ज्या व्यक्तींच्या मिळकत पत्रिका रद्द झाल्या आहेत त्यांना सातबारा उतारा मिळणार असल्याची माहिती माजीमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली.
बाळे, शेळगी व देगाव परिसरातील 85 गट नगर भुपमान क्षेत्राच्या बाहेरील आहेत. तरीही येथील नागरिकांना मिळकत पत्रिका देण्यात आल्या होत्या. या मिळकत पत्रिका रद्द करण्यात आल्या होत्या. या भागातील नागरिकांना त्यांच्या मालमत्तेसाठी ना मिळकत पत्रिका होती ना सातबारा होता. त्यामुळे या भागातील वारस नोंदी, खरेदी-विक्रीचे व्यवहार, बॅंक कर्ज प्रकरणे करण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे या भागातील नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लाग होते. हा प्रश्न सोडविण्यासाठी आमदार विजयकुमार देशमुख यांनी जूनमध्ये जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली. या बैठकीला उपविभागीय अधिकारी हेमंत निकम, भुमिअभिलेख जिल्हा अधीक्षक हेमंत सानप, तहसीलदार जयवंत पाटील, भूमिअभिलेखचे उप अधिक्षक प्रमोद जरग, नभु शिरस्तेदार सचिन राठोड उपस्थित होते. या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
या बैठकीनंतर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी या भागातील सातबारा उतारे सुरु करण्यासंदर्भात आदेश काढला आहे. उत्तर सोलापूरच्या तहसीलदारांनी याबाबतची कार्यवाही करण्याची सूचना करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षापासून शेळगी, बाळे, देगाव परिसरातील नागरिकांना भेडसावणारा हा प्रश्न आता मार्गी लागला आहे.