शहरात केंद्रीय जल प्राधिकरणाच्या परवानगीविना सुरू असलेल्या २४ प्रकल्प चालकांना नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने ३ नोव्हेंबर रोजी नोटिसा देऊन केंद्रीय जलप्राधिकरण व अन्न व औषध प्रशासनाचा नाहरकत दाखला आठ दिवसांत सादर करण्याची मागणी केली होती. मात्र २१ दिवस उलटूनही दाखले दाखल न झाल्याने प्रशासनाने कारवाईला सुरुवात केली आहे. याअंतर्गत शहरातील श्रीकांत जाधव यांच्या उपळाई रोडवरील केंद्राला पाणीपुरवठा विभागाने सील ठोकले आहे.
त्यामुळे प्रकल्प चालकांनी शुक्रवारी विरोधी पक्षनेते अक्कलकोटे व भाऊसाहेब आंधळकर यांची भेट घेतली. त्यांनी विक्रेत्यांची बाजू समजून घेत मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांच्या समोर व्यथा मांडली. जार विक्रेत्यांना दाखले व कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी किमान एक महिन्याची मुदत देण्याची मागणी केली. तसेच भाऊसाहेब आंधळकर यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी संपर्क साधून जार विक्रेत्यांवरील कारवाई तूर्तास थांबविण्याची तसेच ना हरकत प्रमाणपत्रासाठी मुदतवाढ देण्याची विनंती केली. त्यानुसार पालकमंत्री भरणे यांनी मुख्याधिकारी यांना योग्य त्या सूचना दिल्या.