भैय्यूजी महाराजांनी आत्महत्या केल्यानंतर टीव्ही चॅनलने परिचर्चा घडवून आणली. त्यात बोलताना भैय्यूजी महाराजांचे मित्र अशोक वानखेडे यांनी मानवी स्वभावाचा फार चांगला पैलू सांगितला. भैय्यूजी महाराज स्वत: एक आध्यात्मिक गुरू होते, परंतु ते एक व्यक्ती पण होते, आपल्या मनातील स्ट्रेस बाहेर काढायला त्यांच्याजवळ आऊटलेट नव्हता. इतकं महत्त्वाचं असतं का हे आऊटलेट? होय...
कोट्यवधी रुपये खर्च करून उजनी धरण बांधले आणि समजा त्याला आऊटलेटच दिले नसते तर काय झाले असते ? अक्षरश: धरण फुटले असते व गावोगावे नष्ट होऊन न भरून निघणारी मानव व संपत्ती हानी झाली असती इतकं महत्त्वाचं असते. मानवी शरीर म्हणजे विविध पंचतत्त्वापासून सांधलेलं जणू एक धरणच आहे. या शरीरात समस्यांची आवक अतिप्रमाणात झाली तर हे धरण फुटेल की राहील ? हे होऊ नये म्हणून आऊटलेट महत्त्वाचे आहे. माणसाची सध्याची स्थिती ती धावत्या आगगाडीसारखी आहे. प्रत्येक क्षणाशी तो संघर्ष करत आहे. त्यामुळे मनातील विचार, भावना, भावना बाहेर काढण्यासाठी त्याला वेळच नाही. मनातील विचार व भावना किंवा समस्या बाहेर काढायच्या असतील तर एकमेकांशी संवाद, बोलणं केलं पाहिजे. अनेकवेळा आपण स्वत:शीच मनातल्या मनात बोलत असतो. सकाळी डोळे उघडल्या उघडल्या मन बोलायला सुरुवात करते. त्यात भुतकाळातल्या काही गोष्टी असू शकतात, काही वर्तमानकाळातल्या तर काही भविष्यातल्या. या विचारांना कोणताही नियम नसतो ना कुठला निर्बंध.
उलट-सुलट, सुसूत्र - विस्कळीत, उपयोगी- निरुपयोगी, हवेसे-नकोसे विचार कोणत्याही क्रमाने मनात सतत एकापाठोपाठ येत असतात. असे सतत बडबडणारे मन सोबत घेऊनच आपण दिवसांचा प्रवास करत असतो. हे नुसतेच विचार असले असते तर ठीक आहे, पण मनात येणाºया या विचारांच्या पाठोपाठ मनात त्याप्रमाणे भावना, समस्या तयार होतात आणि त्या भावनांच्या व समस्यांच्या प्रमाणे आपली मानसिकता बदलत जाते.
आॅफिसात झालेले भांडण, रिक्षावाल्याशी झालेली बाचाबाची किंवा वाटेत पंक्चर झालेली गाडी, या सगळ्या गोष्टींचा राग बरेच जण घरी आल्यानंतर बायको अथवा मुलांवर काढताना दिसतात. अनेक लोक कोणत्या ना कोणत्या अव्यक्त भावनांच्या, समस्यांच्या ओझ्याचा भार वाहताना दिसतात, परंतु त्या भावना, समस्या कोणत्या आहेत हेच त्यांना उमगत नाही. आजच्या धावपळीच्या युगात कोणी सुखी नाही, असे आपण म्हणतो. दु:ख, निराशा, राग, भीती तसेच अपराधी भावना यांचा भडीमार काही जण स्वत:च्या कुटुंबीयांवर करून वैवाहिक जीवन अस्थिरता निर्माण करत असतात. आनंद, प्रेम, राग, आपुलकी, निंदा, भीती, निराशा या प्राथमिक स्वरूपाच्या भावना असून, त्यांना किती वेळ द्यावा, हे प्रत्येकाने आपापले ठरविले पाहिजे. आपल्या मनातील भावनांना व समस्यांना आपण स्वत:हून वाट करून दिली पाहिजे.
पुरुषांच्या तुलनेत महिलांचे आऊटलेट चांगले आहे कारण मनातील विचार, भावना, समस्या महिला एकमेकांजवळ बोलून दाखवतात किंवा रडून-रडून त्यांच्या डोक्यातील विचार निघून जातात, परंतु पुरुषांचे तसे नाही सर्व गोष्टी आतल्याआत साठवून ठेवतात. ते आऊटलेटचा वापरच करत नाहीत. मित्रांनो, म्हणून आपलं आऊटलेट सदैव सताड उघडं ठेवा. आपल्या तोंडाचे आऊटलेट वापरून आपल्या समस्या, भावना, विचार आपल्या जवळच्यांना सांगा. आपल्या अंतर्मनाचं आऊटलेट ओपन करण्यासाठी विपश्यना, ध्यान साधनेचा अवलंब करा... आणि शक्य झाल्यास जगातील सगळ्यात मोठं आऊटलेट म्हणजे आपले डोळे...उघडा फुटून जाऊ द्या अश्रूचा बांध... वाहून जाऊद्या स्ट्रेस, दु:ख, उपेक्षा... पिस्तूलच्या गोळीने डोक्याला छिद्र पाडण्यापेक्षा, हे केव्हाही सोप्पं...नाही का?- प्रा. तात्यासाहेब काटकर(लेखक शिक्षणक्षेत्रात कार्यरत आहेत)