सोलापूर : केंद्र सरकारने सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील विविध विकास कामांसाठी आठ हजार चारशे कोटी रुपयांची कामे मंजूर केली असून त्यातील पावणेतीन हजार कोटी रुपयांच्या कामांना फेब्रुवारी महिन्यात प्रारंभ होत असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा बुधवारी सोलापुरात झाली. त्या वेळी पंतप्रधानांच्या भाषणापूर्वी बोलताना ते म्हणाले, या देशाचे आणि समाजाचे चित्र आता बदलत आहे. पंतप्रधानांनी भरीव निधी दिल्यामुळे अनेक कामे सुरू झाली आहे. भूसंपादनाच्या कामाला देखील प्रारंभ झाला असून ही कामे वेगात वाढली आहे. सोलापूर जिल्ह्यातील पाणीटंचाई लक्षात घेता चार ब्रिज कम बंधाऱ्याच्या कामांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे येत्या काही काळात पाणीटंचाईचे चित्र पूर्णपणे पालटून जाईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्वासनाचे आणि केलेल्या घोषणेची 99.99% कामे मार्गी लागल्याचा दावा त्यांनी यावेळी केला .
गडकरी पुढे म्हणाले, सिंचनाला प्राधान्य देण्याचे काम सरकारने युद्धस्तरावर हाती घेतले आहे. बळीराजा योजना मंजूर झाली असून त्या माध्यमातून या कामाला वेग आलेला आहे. या कामासाठी नाबार्डकडून 75 टक्के कर्ज घेतले असून ते मंजूर झाले आहे. सरकार यासाठी 25 टक्के अनुदान देणार आहे. सिंचनासाठी आजवर कुणीही सरकारने जेवढा निधी दिला नाही त्यापेक्षा अधिक निधी पंतप्रधान मोदी यांनी दिला असल्याने सिंचनाचे सारे चित्र पालटून जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सोलापूर जिल्ह्यात सध्या 38 साखर कारखाने असून पुन्हा दोन साखर कारखाने नव्याने मंजूर होत असल्याची माहिती त्यांनी दिली. ऊस उत्पादकांच्या प्रश्नाला त्यांनी यावेळी हात घातला. ते म्हणाले, ही साखरेची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कमी आहे. त्यामुळे हे संकट ग्लोबल इकॉनोमीमुळे आहे. यावर मात करण्यासाठी पंतप्रधानांनी ऐतिहासिक पॅकेज दिलेले आहे. यामुळे साखर 29 रुपयांपेक्षा कमी राहणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पंतप्रधान मोदी यांचा काळामध्ये केलेल्या महत्वकांक्षी घोषणा आणि महत्वकांक्षी निर्णयामुळे या देशाचे चित्र बदलत असल्याचा दावा त्यांनी केला. ते म्हणाले की युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतोय. सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण झाली आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात या देशाचा विकास वेगाने होईल.