अरण: कांदा, मुळा भाजी अवघी विठाई माझी! लसूण, मिरची, कोथिंबीरी अवघा झाला माझा हरी! अशी शिकवण देणाºया संत शिरोमणी सावता माळी महाराज यांच्या ७२४ व्या समाधी सोहळ्यानिमित्त माढा तालुक्यातील अरणमध्ये लाखो भक्तांच्या साक्षीने पारंपरिक श्रीफळहंडी सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात गुरुवारी सायंकाळी पार पडला. टाळ मृदंगाच्या गजराने अवघी अरण नगरी दुमदुमली. सोहळ्याच्या सुरुवातीलाच गिड्डे वाड्यात मानाच्या कड्याची पूजा करण्यात आली. यानंतर गिड्डे वाड्यातून वाजत गाजत हरी गिड्डे यांच्या डोक्यावर ही श्रीफळहंडी पारावर आणण्यात आली. ती वरती बांधण्यात आली. त्यावर हजारो भक्तगण, वारकºयांनी वाहिलेले नारळ बांधण्यात आले. पारासमोरील पटांगणात ह. भ.प. कान्होबा महाराज देहूकर यांच्या हंडीसमोर काल्याचे कीर्तन झाले. यानंतर या हंडीला फिरते ठेवण्यात आले. त्याचवेळी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे वंशज देहूकर घराण्याचे हरिभक्त पारायण श्रीगुरु बाळासाहेब महाराज देहूकर यांच्या हस्ते हंडी फोडण्यास प्रारंभ झाला. यावेळी ह.भ.प. बापूसाहेब महाराज देहूकर, श्रीविठ्ठल महाराज देहूकर, हरीप्रसाद महाराज देहूकर, भानुप्रसाद देहूकर,महेश महाराज व नीलकंठ महाराज देहूकर यांनी ही हंडी फोडली. भाविकांनी ‘याचि देही, याचि डोळा ’ हा नयनरम्य सोहळा आपल्या हृदयात साठवून आनंद लुटला.
हा सोहळा पाहण्यासाठी मोडनिंब, तुळशी, वरवडे, लऊळ, भेंड, पडसाळी, सोलंकरवाडी, व्होळे, जाधववाडी बैरागवाडी येथील ग्रामस्थ तर टणू, इंदापूर, टाकळी व महाराष्ट्रातील अनेक गावातील लाखो वारकरी भाविक व सावता महाराजांचे लाखो भक्त उपस्थित होते.
या यात्रा सोहळ्यासाठी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठल आबा गाजरे, सचिव विजय शिंदे, जि. प. सदस्य भारत शिंदे, माजी समाजकल्याण सभापती शिवाजी कांबळे, सुधाकर कुलकर्णी, सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे, पुजारी रमेश महाराज वसेकर,भीमराव वसेकर,दादा वसेकर, विठ्ठल वसेकर,जनार्दन वसेकर,अंकुश महाराज वसेकर,अमोल महाराज वसेकर, नितीन वसेकर, रमेश वसेकर, हरी गिड्डे, नागनाथ गिड्डे , देवस्थान ट्रस्टचे संचालक, सेवाभावी न्यासचे संचालक, यात्रा पंच कमिटीचे संचालक, अन्नछत्र मंडळाचे संचालक, देहूकर फडकरी वारकरी, मानकरी, स्वयंसेवक, अन्नदाते यांनी यासाठी परिश्रम घेतले.
यात्रा महोत्सव सुरळीतपणे पार पाडण्यासाठी मोडनिंब पोलीस दूरक्षेत्राचे सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय आसबे, विनायक भानवसे, गोरे, गडदे, गरड महिला पोलीस चव्हाण, भोगे, हवालदार तावसे यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
अर्धा तास चालला नयनरम्य सोहळा- या सोहळ्यात भक्तगण एकमेकांच्या मदतीने नारळ तोडण्याचा प्रयत्न करीत होते. श्रीफळ हंडीतील नारळ प्रसाद मिळवण्यासाठी भक्तगणांची एकच धडपड सुरु होती. तब्बल अर्धा तास हा सोहळा सुरू होता. महाराष्टÑातील कानाकोपºयातून भक्तगणांनी या सोहळ्यासाठी गर्दी केली होती.
यात्रेचे वैशिष्ट्य- महाराष्ट्रातील एकमेव असा अविस्मरणीय श्रीफळहंडी (काला) यात्रेचा सोहळा अरणमध्ये लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला.- भक्तांनी वाहिलेल्या नारळाची व लाह्यांनी भरलेली मडक्याची हंडी उंच बांधून हंडी फिरवून काठीने नारळ फोडतात. यासाठी भक्तगण एकावर एक उभारुन मनोरा बनवून नारळ तोडून भक्तीभावानग प्रसाद घरी नेला.
यंदा सोहळा अर्धा तास लवकर- दरवर्षी साडेसहा वाजता सुरू होणारा श्रीफळहंडी सोहळा यावर्षी अर्धा तास लवकर सुरू झाला त्यामुळे अनेक घरांमध्ये आलेल्या पाहुण्यांना हा नयनरम्य सोहळा पाहायला मुकावे लागले.
अन् मंत्रीगण सोहळा न पाहताच गेले- यावर्षी या सोहळ्यासाठी नूतन राज्यमंत्री अतुल सावे व कॅबिनेट मंत्री महादेव जानकर हे दोन मंत्री श्रीफळहंडी सोहळ्याच्या अगोदरच्या कार्यक्रमाला आले पण श्रीफळहंडी सोहळा न पाहताच निघून गेले त्यामुळे भाविकांमध्ये उलट सुलट चर्चा होती.