सन १९८७ मध्ये वडापूर येथे भीमा नदीवर बंधारा बांधला. त्याच्या देखभालीचे काम पूर्वी सोलापूर पाटबंधारे विभागाकडे होते. काही वर्षांपूर्वी हा बंधारा पंढरपूर उपविभागाकडे सोपवण्यात आला आहे. दहा वर्षांपासून वडापूर बंधाऱ्याला गळती लागल्याने बंधाऱ्याच्या पायातून पाण्याचा धो-धो प्रवाह वाहत आहे. ग्रामस्थांनी आणि ग्रामपंचायतीने याबाबत वारंवार तक्रारी केल्या, मात्र त्याच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. गळतीमुळे दर वर्षी बंधाऱ्यातील पाणीसाठा निर्धारित वेळेच्या आधीच संपून जातो. शेतकऱ्यांकडून ही या बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे तात्पुरते प्रयत्न झाले, पण त्यात यश आले नाही.
लोकवर्गणीतून केला खर्च
वडापूर बंधाऱ्याच्या पाण्यावर परिसरातील शेती अवलंबून आहे. नदीच्या दोन्ही काठावरून पाण्याचा उपसा केला जातो. हा बंधारा कोरडा पडल्यास हजारो एकर शेतीचे नुकसान होणार आहे. वारंवार तक्रारी करूनही पाटबंधारे खाते दुरुस्ती खर्च करीत नाही, ही बाब लक्षात येताच शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून गळती कमी करण्याचा प्रयत्न केला.
----
वडापूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. परंतु त्यासाठी निधी उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. देखभाल दुरुस्तीचे काम सोलापूर विभागाकडून पंढरपूर विभागाकडे हस्तांतरित केल्याने अधिकच दुर्लक्ष झाले आहे.
- सुभाष पाटील, शेतकरी, वडापूर
------
सध्या अस्तित्वात असलेल्या वडापूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले नाही. या बंधाऱ्याजवळच नवीन बॅरेजेस उभारण्यात येणार आहे. त्याला जलसंपदा विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे दुरुस्तीसाठी होणारा खर्च अनाठायी ठरेल.
- धनंजय कोंडेकर, कार्यकारी अभियंता,पंढरपूर पाटबंधारे विभाग
-------
वडापूर बंधाऱ्यालगत नवीन बॅरेजेस बांधण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. या बॅरेजेसच्या दरवाजाचे संकल्प चित्र तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर बॅरेजेसच्या कामाची निविदा काढली जाईल. ही वस्तुस्थिती असल्याने बंधाऱ्याच्या दुरुस्तीवर खर्चासाठी निधी उपलब्ध होत नाही.
-नारायण जोशी, उपकार्यकारी अभियंता
उजनी कालवा क्र. ९, मंगळवेढा विभाग
----
३०वडापूर बंधारा
भीमा नदीवरील वडापूर बंधाऱ्याला गळती लागल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे.