सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या बुधवारी होणाºया जयंती उत्सवानिमित्त श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाने मंगळवारी मध्यरात्री शिवबांचा पाळणा सोहळ्याचे नेटके नियोजन केले असून, शहर आणि जिल्ह्यातील ४४ वीरमाता, वीरपत्नींच्या उपस्थितीत होणाºया या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी पाच हजारांहून अधिक महिला उपस्थित राहणार आहेत. या महिलांची सुरक्षाही महामंडळाने घेतली आहे. शेवटची महिला घरी सुखरुप जाईपर्यंत एक हजार मावळे जागोजागी खडा पहारा देणार आहेत.
शहराच्या हद्दवाढ भागातील महिलांना सोहळ्यास्थळी येता यावे यासाठी आझाद हिंद शिवजन्मोत्सव युवक मंडळाने २५ रिक्षांद्वारे मोफत वाहतूक सेवा पुरवली आहे. शिवाय महापालिकेच्या परिवहन विभागाकडून शहरातील सर्वच मार्गांवर बससेवा देण्यात येणार आहे. पाळणा सोहळ्याच्या वातावरण निर्मितीसाठी रात्री ८ ते १० पर्यंत छत्रपती शिवाजी चौकात शिवरंजनीचे कलाकार ‘शिवकल्याण राजा’ हा शिवगीतांचा कार्यक्रम सादर करणार आहेत. शिवबांचा पाळणा सोहळा ‘न भूतो न भविष्यती’ होण्यासाठी मावळे अन् महिला कार्यकर्त्यांचे स्वयंसेवक, स्वयंसेविका यांचे गट पाडण्यात आले आहेत.
प्रथमच शिवसन्मान पुरस्काराची योजना- श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे संस्थापक स्व. मुरलीधर घाडगे (पैलवान) यांच्या स्मरणार्थ यंदाच्या वर्षापासून शिवसन्मान पुरस्कार देण्याची घोषणा श्रीकांत घाडगे यांनी केली. यंदाचा हा पुरस्कार प्रार्थना फाउंडेशनचे प्रसाद मोहिते आणि अनू मोहिते यांना देण्यात येणार आहे. रोख ५ हजार, सन्मानचिन्ह आणि रोपटे असे या पुरस्काराचे स्वरुप असणार आहे.
पार्किंगची अशी असणार व्यवस्था
- - छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाळणा सोहळ्यात सहभागी होणाºया शिवप्रेमींच्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. पार्क चौक, नवी पेठ भागाकडून येणाºया वाहनांसाठी पारस इस्टेट, सुराणा मार्केट, अंजठा लॉज या ठिकाणी पार्किंग असणार आहे.
- - पुणे महामार्गावरुन येणाºया वाहनांसाठी हॉटेल अॅम्बेसिडर ते प्रभाकर महाराज मंदिर मार्गावरील रस्त्याच्या एका बाजूने पार्किंगचे नियोजन करण्यात आले आहे.
- - कोंतम चौक, बाळीवेस, मराठा वस्ती परिसरातून येणाºया वाहनधारकांनी बाजीअण्णा मठ ते काळी मशीद आणि बाजीअण्णा मठ ते पत्रा तालीम या रस्त्याच्या कडेला आपली वाहने लावावीत.
शिवप्रेमींसाठी आचारसंहिता अन् इशाराही
- - मंगळवारी मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा सोहळा होणार आहे. सोहळ्यासाठी किमान पाच ते सहा हजार महिला उपस्थित राहतील. महिलांचा विचार करुन मध्यवर्ती महामंडळाने शिवप्रेमींना विशेषत: युवकांना आचारसंहिता घालून दिली आहे.
- - युवक शिवप्रेमींनी घोषणाबाजी, हुल्लडबाजी करु नये. विविध मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या सायलेन्सरच्या पुंगळ्या काढून दुचाकी चालवू नये. असे प्रकार करणाºया कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून कारवाई होईल, असा इशारा देण्यात आला आहे.
- - आपण छत्रपतींचे पाईक असल्याने या पाळणा सोहळ्यास उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी शांततेचे वातावरण ठेवावे. सोहळ्यात सहभागी महिलांच्या रक्षणाची जबाबदारीही यशस्वीपणे पेलावी. शेवटची महिला सुखरुपणे घरी गेली की नाही, याची खात्री करावी.