सोलापूर : सकल हिंदू समाजातर्फे रविवारी (दि. २६) लव्ह जिहाद विरोधी, धर्मांतरण विरोधी कायदा व्हावा, गोहत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचा बलिदान दिवस (फाल्गुन अमावस्या) धर्मवीर दिन म्हणून शासनाकडून घोषित व्हावा या प्रमुख चार मागण्यांकरिता विराट हिंदू गर्जना मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी दुपारी ३ वाजता छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकातून या मोर्चास प्रारंभ होणार आहे, अशी माहिती सकल हिंदू समाजाचे समन्वयक अंबादास गोरंटला यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
याबाबत श्री. गोरांटला म्हणाले, देशात लव्ह जिहादची समस्या हिंदूंना मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. तसेच अनेक गावांमध्ये हिंदूंचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतर केले जात आहे. गोहत्या बंदीचा कायदा लागू आहे. मात्र त्याची कठोर अंमलबजावणी होत नसल्यामुळे दररोज हजारो गाई कापल्या जात आहेत. त्यामुळे या सर्व समस्यांवर कठोर उपाय योजना कायद्याद्वारे करावी आणि धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराजांचा बलिदान दिवस म्हणजेच फाल्गुन अमावस्या हा दिवस 'धर्मवीर दिन' म्हणून सरकारने घोषित करावा या मागणीकरिता हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
रविवारी दुपारी ३ वाजता हा मोर्चा छत्रपति श्री शिवाजी महाराज चौकातून प्रारंभ होईल. येथून बाळीवेस, टिळक चौक, मधला मारुती, माणिक चौक, श्री सोन्या मारुती, श्री दत्त मंदिर, सावरकर मैदान, सुभाष चौक, सरस्वती चौकमार्गे हिंदू गर्जना मोर्चा चार हुतात्मा पुतळा येथे विसर्जित होणार आहे. या मोर्चाच्या समारोपाला प्रखर हिंदुत्ववादी नेते धनंजय देसाई यांचे मार्गदर्शन होणार आहे.
या मोर्चासाठी हिंदू बांधवांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. सोलापुरातील विविध संस्था, संघटना, मंडळे, ज्ञाती संस्था, सामाजिक संस्था यांनी या मोर्चाच्या तयारीमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे, असे गोरांटला यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस सकल हिंदू समाजाचे समन्वयक संतोष कुलकर्णी, रंगनाथ बंकापूर, रवी गोणे, संजय जमादार, श्रीधर अरगोंडा, प्रशांत हलसंगी, प्रमोद येलगेटी, अश्विनी चव्हाण, जयदेव सुरवसे, नागेश बंडी आदी उपस्थित होते.