सोलापूर : माघवारी पालखी सोहळा परंपरेने श्री क्षेत्र पंढरपूरला पायी चालत जात असतो. " जाता पंढरीसी सुख वाटे जीवा " या उक्तीप्रमाणे हजारो वारकरी भाविक "ज्ञानोबा तुकाराम ". नामाच्या गजरात उत्साहात चालत जातात. या सोहळ्यातील तिसरे भव्य गोल रिंगण महात्मा गांधी विद्यालय, पेनूर, ता. मोहोळ जि. सोलापूर येथे रविवारी पार पडले. हा रिंगण सोहळा सुरु करून ऐतिहासिक परंपरा सुरु झाली आहे.
माघवारी निमित्त मोहोळ मार्गे पंढरपुरला जाणाऱ्या दिंडीचे रिंगण सोहळासाठी एकत्रीकरण करून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोलापूर व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोलापूर यांच्या पुजनाने या कार्यक्रमास प्रारंभ झाला. अखिल भाविक वारकरी मंडळ व जोतीराम चांगभले (प्रदेश अध्यक्ष), किसन कापसे (प्रदेश उपाध्यक्ष), संजय पवार (शहर अध्यक्ष), यांच्या कडून पेनूर ग्रामस्थांतर्फे सरपंच सुजित अवारे, उपसरपंच सागर चावरे यांच्याकडून सन्मान करण्यात आला आहे.
तसेच दर्शन ढगे, राकेश अन्नम, पांडुरंग शिंदे, बप्पा कापसे, अच्युत मोफरे यांनी पालखी पूजन केले. सरपंच सुजित आवारे, ह.भ.प. भागवत चवरे महाराज, ह भ प दयानंद भोसेकर महाराज, सागर चावरे आदींच्या हस्ते रिंगणातील मानाच्या अश्वाचे पूजन करण्यात आले होते. सर्व दिंडी प्रमुख विणेकरी यांचा सत्कार करून रिंगण सोहळा सुरु करण्यात आले. अश्व धावताना सात्विक ऊर्जा दिसत होती. अतिशय आनंदी वातावरण असल्याने विद्यार्थी रिंगण पुर्ण करताना उत्साह खूपच चांगला दिसून आला.