अक्कलकोट: ‘जन्मोजन्मी हाच पती मिळो’ अशी स्वामी समर्थांकडे प्रार्थना करीत अक्कलकोट शहर तालुक्यातील सुवासिनींनी वडाला फेऱ्या मारुन स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. शहर-ग्रामीण भागातही हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. स्वामी समर्थ मंदिरात पहाटेपासूनच विधिवत पूजेनंतर भाविकांसाठी मंदिर खुले केले होते. दुपारी १२ पर्यंत गर्दी तुरळक होती; मात्र त्यानंतर वटपौर्णिमेनिमित्त हजारो सुवासिनींच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. दरपौर्णिमेला येणारे भक्तगण आणि आज वटपौर्णिमेमुळे भाविकांच्या गर्दीत वाढ झाल्याचे दिसून आले. स्वामी समर्थ मंदिरात ज्या वडाच्या झाडाखाली स्वामी समर्थांनी २२ वर्षे तपश्चर्या केली त्या पवित्रा वडाच्या झाडाभोवती फेऱ्या मारुन हजारो सुवासिनींनी ‘जन्मोजन्मी हाच पती मिळू दे’ असे औक्षण करत स्वामी समर्थांकडे आशीर्वाद मागितले. खास वटसावित्री सण साजरा करण्यासाठी परजिल्ह्यातूनही महिला आल्या होत्या.मंदिर परिसराला जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. शहरातील प्रमिला पार्क, विजय गणपती, राजेराय मठ, शिवपुरी, नवीन राजवाडा, हन्नूर रोड, सोलापूर रोडवरील वडाच्या झाडाला फेऱ्या मारुन वटसावित्री उत्सव साजरा केला.------------------------भक्तनिवास हाऊसफुल्लवटपौर्णिमेचे औचित्य साधून परगावाहून येणाऱ्या भक्तगणांनी अक्कलकोट शहरात एकच गर्दी केली होती. एक दिवस अगोदरच मंदिर समिती, अन्नछत्र मंडळाच्या भक्तनिवासातील सर्व खोल्या बूक झाल्या होत्या. शहरातील अन्य लॉजवरही गर्दी दिसून आली. भाविकांना दर्शन सुलभ व्हावे म्हणून मंदिर समितीचे विश्वस्त महेश इंगळे, विलास फुटाणे, सुभाष शिंदे, आत्माराम घाटके, तुळशीदास आवटी, दयानंद हिरेमठ, राजू निलवाणी, अन्नछत्र मंडळात शाम मोरे, अमोल भोसले, अभय खोबरे, आप्पा हंचाटे आदींनी परिश्रम घेतले.
हजारो सावित्रींनी घेतले समर्थांचे दर्शन
By admin | Published: June 13, 2014 1:21 AM