सोलापूर: टीएचआर आहार पुरवठ्याची जबाबदारी स्थानिक पातळीवर महिला बचत गटांना देण्याच्या न्यायालयाच्या आदेशाला न जुमानता आयुक्त पातळीवर एकत्रित टेंडर काढण्यात आले आहे. स्थानिक बचत गटांनीही आहार पुरवठ्याची तयारी केल्याने आता नक्की काय होणार याकडे लक्ष लागले आहे. राज्यातील गरोदर महिला, सहा महिने ते तीन वर्षांपर्यंतच्या बालकांना घरपोच आहार (टीएचआर) केला जातो. न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय आहार समितीमार्फत एकात्मिक बालविकास सेवा विभागाकडून यासाठी अर्ज मागविले जातात. महिला बचत गट, महिला मंडळाकडून आलेल्या अर्जातून निवडीची प्रक्रिया राबवायची आहे, यासाठी सोलापूर जिल्ह्यातील २० प्रकल्पांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यापैकी ११ प्रकल्पांसाठी आहार पुरवठा करण्यासाठी महिला बचत गटांनी तयारी केली आहे. जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखालील समितीनेही ११ महिला बचत गटांना आहार तयार करण्याची मशिनरी घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार बचत गटांनी मशिनरी बसविल्या असून त्याची तपासणी महिला व बालकल्याण अधिकारी, जिल्हाधिकार्यांचे प्रतिनिधी, महिला आर्थिक मंडळाचा प्रतिनिधी, अन्न औषध प्रतिबंधक खात्याचा प्रतिनिधी, जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाचा प्रतिनिधी तसेच बालविकास प्रकल्प अधिकार्यांनी नुकतीच केली आहे. बचत गटांनी आहारही तयार केला असल्याचे तपासणीवेळी दिसून आले. असे असताना बुधवारी महिला व बालकल्याण खात्याच्या आयुक्तांना आहार पुरवठ्याचे एकत्रित टेंडर काढले आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरील बचत गटांना आहार तयार करण्याची जबाबदारी सोपविण्यावर प्रश्नचिन्ह उभारले आहे. सोलापूर जिल्ह्यातील बचत गटाचे पदाधिकारी शुक्रवारी महिला व बालकल्याण आयुक्तांना भेटले असून आहार तयार करण्याचे काम सुरू केल्याचे सांगितले. त्यानंतर आयुक्तांनी विचार करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले.
-------------------------
जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने स्थानिक बचत गटांना टीएचआर आहार पुरवठा करण्याची जबाबदारी दिली आहे. त्यानुसार स्थानिक बचत गटांनाच आहार पुरवठा करण्याची जबाबदारी देणे सोयीचे होणार आहे. - जयमाला गायकवाड सभापती महिला व बालकल्याण जि. प.