कुर्डूवाडी : इन्स्टाग्राम ॲपवर ओळख झालेल्या पुण्याच्या एका मैत्रिणीला वारंवार चॅटिंग का करतो, करत जाऊ नकोस म्हणून तिचा पंढरपूरमध्ये राहणारा दुसरा मित्र रणजित शिर्के वारंवार धमकी देत होता. या धमकीला कंटाळून भोसरेच्या (ता.माढा) विकास राजेंद्र ओहोळ (१९) या तरुणानं मानसिक तणावाखाली येऊन राहत्या घरी फॅनच्या लोखंडी अँगलला फास घेऊन आत्महत्या केेली. ३ मार्च रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी शनिवारी विकासच्या भावाने फिर्याद दिल्याने पोलिसात गुन्हा नोंदला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत विकास ओहोळ हा सोलापूर येथील आयटीआय कॉलेजला भोसरे (कुर्डूवाडी)वरून येऊन - जाऊन शिक्षण घेत होता. मोबाइलच्या इन्स्टाग्राम ॲपद्वारे त्याची पुण्यातील एका मुलीची ओळख झाली. वारंवार चॅटिंगमुळे ती त्याची चांगलीच मैत्रीण बनली. हे पुण्याच्या मैत्रिणीच्या इन्स्टाग्रामवरील दुसऱ्या रणजित शिर्के (रा. पंढरपूर) या मित्राला समजले. तेव्हापासून तो विकासला माझ्या मैत्रिणीला इन्स्टाग्रामवरून चॅटिंग करू नकोस, तू सांगोला पोलीस स्टेशनला ये तुझ्यावर गुन्हाच दाखल करतो अशी धमकी देत होता. यामुळे विकास मानसिक तणावाखाली आला होता. यातूनच त्याने आत्महत्या केली.
सकाळी वरच्या मजल्यावर गेलेला विकास खाली का येत नाही म्हणून त्याचा भाऊ वर गेल्यानंतर त्याला संबंधित प्रकार दिसला. दरवाजा उघडल्यानंतर वारंवार वाजणारा मोबाइल उचल्यानंतर रणजित शिर्के फोन करून तुला सोडणार नाही म्हणत होता व धमकी देत असल्याचे भाऊ आकाशला कळून आले. यावरून कुटुंबावर झालेले दुःख व त्याचा विधी पूर्ण केल्यानंतर मयताचा भाऊ आकाश ओहोळने रणजित शिर्के (रा. पंढरपूर) याच्याविरोधात उशिराने फिर्याद दिल्याने पोलिसांनी गुन्हा नोंदला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र डोंगरे करीत आहेत. -----
सकाळी एकत्र नाश्ता.. दुपारी सुसाइड
विकासचा भाऊ आकाशने विश्वासात घेऊन विचारले असता त्याने संबंधित प्रकार सांगितला. यावर आकाशने ‘तू काळजी करू नकोस’ असे २ मार्च रोजी सांगितले होते; परंतु तो तणावाखालीच होता. बुधवारी ३ मार्चला विकासच्या घरातील सर्वांनी सकाळी साडेनऊच्या दरम्यान एकत्र नाश्ता केला. यावेळी विकासने ‘मला माझ्या मित्राच्या लग्नाला साडेबाराला जायचे आहे. तोपर्यंत वरच्या मजल्यावर जाऊन थोडा आराम करतो,’ असे म्हणून तो निघून घराच्या वरच्या मजल्यावर गेला. यानंतर बारा वाजत आले तरी विकास खाली कसा आला नाही म्हणून भाऊ आकाशने वर जाऊन पाहणी केली. तर दरवाजा आतून बंद होता. त्याने पाठीमागील खिडकीतून आतमध्ये डोकाविले. तर विकास फॅनला लटकलेला दिसून आला. लागलीच आकाशने कुटुंबाच्या मदतीने दरवाजा तोडला व त्याला दवाखान्यात नेले. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.