सोलापूर : राजस्व नगरजवळ फॉर्च्यूनर कारमध्ये चार चाकी जीप (क्र - एमएच १३ बीई ५१५१ तलवार बाळगल्याप्रकरणी एका माजी आमदाराच्या नातवासह तिघांना विजापूर नाका पोलिसांनी अटक केली. ही कारवाई रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास कोम्बिंग आॅपरेशन दरम्यान करण्यात आली.
अमर रमेश पाटील (वय २३, रा. रेल्वे लाईन, सेंट जोसेफ स्कूलच्या पाठीमागे, सोलापूर), अजित मल्लिनाथ किवडे (वय २४, रा़ ६३३, उत्तर कसबा, हिरेहब्बू कॉम्प्लेक्स पाठीमागे, सोलापूर), आदित्य धन्यकुमार शहा (वय २५, रा़ सम्राट चौक, पॉलिटेक्निकच्या पाठीमागे, सोलापूर ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. लोकसभा निवडणुकीनिमित्त सोलापुरात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहितेनिमित्त रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास काळे यांच्या पथकामार्फत कोम्बिंग आॅपरेशन सुरू होते.
दरम्यान, पोलिसांना पोतदार कॉलेजसमोर फॉर्च्यूनर ही चारचाकी गाडी संशयास्पदरित्या उभी असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी चार चाकी गाडीची तपासणी केली असता त्यात तलवार हे शस्त्र आढळून आले. पोलिसांनी याबाबत परवान्याची विचारणा केली असता आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. संशय आल्याने पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. यांच्याकडून चार चाकी वाहन तीन मोबाईल एक तलवार, लोखंडी टॉमी व रोख रक्कम असा एकूण १६ लाख १० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल साईनाथ एसलवाड यांनी फिर्याद दिली आहे. अमर पाटील हा अक्कलकोटमधील एका भाजपच्या माजी आमदाराचा नातू असल्याचे सांगितले.