कुर्डूवाडी : माढा तालुक्यातील पडसाळी येथून म्हैस खरेदी करण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या दोघांना ५ जुलै रोजी भोसरे हद्दीत कोयत्याचा धाक दाखवून २७ हजार ४०० रुपये लुटले तसेच मारहाण करून चौघांनी पळवून नेले होते. या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
गुन्हा दाखल होताच कुर्डूवाडी पोलिसांनी अवघ्या काही तासांत चारपैकी तीन आरोपींना जेरबंद केले. अक्षय अविनाश पवार (वय २०), कृष्णा सर्जेराव शिंदे (१९), समाधान शिलेमान पवार (२४, सर्व रा. भांबुरे वस्ती, भोसरे) अशी लुटमार करणाऱ्यांची नावे असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
त्यांनी लुटलेल्या रकमेपैकी २४ हजार रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत.
उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वाघमारे, पोलीस हेडकॉन्स्टेबल घाडगे, पोलीस नाईक ठोंगे, मंडलिक, पोलीस शिपाई दत्ता सोमवाड यांच्या पथकाने ही कामगिरी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वाघमारे करत आहेत.