सोलापूर : कुसूर खानापूर ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदाचे उमेदवार भौरम्मा गेनसिद्ध पुजारी यांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नामंजूर केले आहे. भौरम्मा यांना तीन अपत्ये असून त्या निवडणुकीसाठी अपात्र आहेत, असा आक्षेप लक्ष्मी मनोहर नरोटे यांनी घेतला. त्या संदर्भात त्यांनी पुरावे देखील सादर केले. पुराव्याच्या आधारे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भौरम्मा यांचे अर्ज नामंजूर केले. लक्ष्मी नरोटे या देखील सरपंद पदाचे उमेदवार आहेत.
सोमवारी, ग्रामपंचायत निवडणुकीतील अर्जांची छाननी झाली. यात पुजारी यांचा अर्ज अपात्र ठरला. २००३ साली भौरम्मा यांना पहिले अपत्य झाले. २००४ साली दुसरे तर २००५ साली तिसरे अपत्य झाले. तिन्ही अपत्यांचा जन्मदाखला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केला. तिन्ही अपत्ये २००१ नंतर जन्माला आली आहेत. त्यामुळे, भौरम्मा या सरपंच पदासाठी अपात्र आहेत, असा आक्षेप लक्ष्मी नरोटे यांनी घेतला.
सुप्रिया नावाची मुलगी २०१९ साली मयत झाली. ती विवाहित होती. तिचा मृत्यू दाखला जोडला आहे. सध्या दोनच अपत्ये असून मी निवडणुकीसाठी पात्र आहे, असा खुलासा भौरम्मा पुजारी यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर केला. भौरम्मा यांचे म्हणणे फेटाळून लावत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचे अर्ज नामंजूर केले. लक्ष्मी नरोटे यांच्या बाजूने ॲड. शरद पाटील यांनी बाजू मांडली.