सोलापूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत ‘परीक्षा पे चर्चा’ हा उपक्रम सोमवारी दिल्लीत पार पडला. यामध्ये जिल्ह्यातील आकिरा निसार (केएलई, सोलापूर), ऐश्वर्या विजापुरे (केंद्रीय विद्यालय, सोलापूर) आणि अभिषेक लोंढे (आर्या पब्लिक स्कूल, पिंपळनेर) या तिघांचा या कार्यक्रमात समावेश होता. पंतप्रधानांसमवेतच्या कार्यक्रमात दिसणार म्हणून इथल्या शाळेत विद्यार्थी अन् गुरुजनांनी प्रोजक्टरद्वारे टीव्हीच्या माध्यमातून या कार्यक्रमाचा आनंद लुटला.
सोमवारी सकाळी ११ वाजता दिल्लीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात पिंपळनेर (ता. माढा) येथील आर्या पब्लिक स्कूलचा इयत्ता दहावीत शिकणारा विद्यार्थी अभिषेक अनंत लोंढे याचा पंतप्रधानांशी थेट चर्चेत सहभाग होता. पंतप्रधानांना तो काय प्रश्न विचारतोय हे कुतूहलाने पाहण्यासाठी स्कूलच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये एकच गर्दी केली होती. कॉन्फरन्स हॉलमध्ये प्रोजेक्टर, सीपीओ व नेट कनेक्शन उपलब्ध करून ठेवण्यात आले होते. अतिशय सुंदर अशा कॉन्फरन्स हॉलमध्ये विद्यार्थी व शिक्षक हा लाईव्ह कार्यक्रम पाहत असल्याचे दिसून आले.
दिल्लीमध्ये सुमारे दोन हजार मुले या कार्यक्रमाला उपस्थित होते. इतक्या मुलांशी देशाचे पंतप्रधान संवाद साधतात आणि यात माझा समावेश असल्याने याचा खूप आनंद वाटत आहे. या संधीमुळे इतर राज्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधता आला. कार्यक्रमात असलेली व्यवस्था अगदी भव्य अशी होती. आपण सुद्धा देशासाठी काहीतरी मोठे काम करु असा आत्मविश्वास मिळाला, असा अनुभव जुळे सोलापूर येथील के.एल.ई. इंग्लिश मीडियम स्कूलची दहावीची विद्यार्थिनी अचिरा निसार हिने सांगितला. ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमासाठी तिची निवड झाली होती. अचिरा हिला शाळेचे प्राचार्य शिवानंद शिरगावे यांचे मार्गदर्शन लाभले.
स.हि.ने. प्रशालेतील सुमारे ८० विद्यार्थ्यांनी परीक्षा पे चर्चा या उपक्रमात सहभाग घेतला. शाळेच्या डिजिटल क्लासरुममध्ये प्रक्षेपणाचे आयोजन करण्यात आले होते. परीक्षेला सामोरे कसे जावे, याबाबत विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केले. यापुढे आणखी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरा जाण्याचा विश्वास विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. यावेळी विद्यार्थ्यांसोबत मुख्याध्यापिका नीता येरमाळकर, शिक्षक नागेश जाधव व दिलीप राठोड आदी उपस्थित होते.
आॅनलाइन परीक्षेद्वारे झाली निवड- या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दिल्ली येथील सी.बी.एस.ई. बोर्डाने आर्या पब्लिक स्कूलला कळविले होते. त्यानुसार डिसेंबर महिन्यात दिल्ली येथील मनुष्यबळ विकास मंत्रालयाने देशातील सहभागी होणाºया विद्यार्थ्यांची दोन वेळा आॅनलाइन दोन वेगवेगळ्या विषयांवर परीक्षा घेतली होती. त्यामध्ये लाखो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र स्टेट एज्युकेशन रिसर्च सेंटरने नियंत्रण केले होते. त्यामध्ये वरील तिघांची निवड झाली. यासाठी संपूर्ण खर्च शासनाने केला.