माढा : दारफळ येथील गावठाणाजवळ सीना नदीच्या तीरावर पूरसंरक्षक भिंत व घाट पायऱ्यांच्या बांधकामासाठी महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाकडून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून ३ कोटी ९ लाख ६९ हजार रुपये मंजूर झाल्याची माहिती आमदार बबनराव शिंदे यांनी दिली आहे.
कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे अंतर्गत दारफळ सीना हे गाव सीना नदीच्या काठावर आहे. नदीच्या तटाजवळच काही लोकांची घरे, धार्मिक स्थळे व शाळा आहे. नदीला येणाऱ्या पुरामुळे नदीच्या काठाची धूप व झीज होत आहे. त्यामुळे मारुती मंदिर, स्मशानभूमी, शाळेचे मैदान व इमारत यांना धोका निर्माण झाला आहे. मागील वर्षी एक महिला नदीच्या काठावर कपडे धूत असताना मरण पावली. या घटनेनंतर माजी उपसभापती बाळासाहेब शिंदे व माढेश्वरी अर्बन बँकेचे उपाध्यक्ष अशोक लुणावत यांचे शिष्टमंडळ आमदार बबनराव शिंदे व जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांना भेटले. संरक्षक भिंत व घाट पायऱ्या बांधण्याची मागणी सरपंच शीलाताई कांबळे, उपसरपंच शिवाजी बारबोले, अशोक शिंदे यांनी केली होती. आमदार बबनराव शिंदे यांनी शासनदरबारी प्रयत्न केला. हे काम झाल्यानंतर पुराचा धोका टळणार आहे. घरे, मंदिरे व शाळा सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे. लवकरच निविदा प्रसिद्ध करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.