रेवणसिद्ध जवळेकर
सोलापूर : १९ नोव्हेंबर २०१७ ची ती पहाट... तुळजापूर रस्त्यावरील अपघातात एकलुते एक अशी तीन मुलं काळाच्या पडद्याआड गेली... तशी तिन्ही मुलांचा जबरदस्त दोस्ताना. या तीन तरण्याबांड लेकरांचं अकाली जाण्यानं समदु:खी माळगे, गुमडेल अन् आसबे ही कुटुंबे एकत्र आली आहेत. स्वत:च्या दु:खावर फुंकर घालीत हे तीन मित्र जणू सख्ख्या भावासारखे आज वावरताना दिसतात. ‘आमची मुलं गेली... तुमची जाऊ देऊ नका’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीत आणून ‘त्या’ लेकरांना खºया अर्थाने श्रद्धांजली असेल, अशा भावना मडोळप्पा नागेश माळगे, जयंत विजयकुमार गुमडेल आणि विजय चांगदेव आसबे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.
संगमेश (विनू) मडोळप्पा माळगे, दीपक जयंत गुमडेल आणि अक्षय विजय आसबे ही तीन मुले नागेश करजगी आर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बी. ई. मेकॅनिक या तृतीय वर्षात शिकत होती. अभ्यासातच नव्हे तर कॉलेजच्या अॅक्टिव्हिटीमध्येही तिघे सरसच होती. काळाला ते पाहावले नाही आणि १९ नोव्हेंबर २०१७ ची पहाट त्यांच्यासाठी काळरात्र ठरली. जशी तिघांची मैत्री तशी त्यांच्या एकमेकांच्या पित्याची ओळख ना पाळख. मात्र घटनेच्या महिनाभरानंतर तिघे समदु:खी पिता एकत्र आले. केवळ हे तिघेच नव्हे तर तिघांच्या कुटुंबातील सदस्यही एकमेकांचे दु:ख दूर सारण्यासाठी अगदी समरस होऊन गेले आहेत. अगदी हाताला आलेली... उद्या परवा आपलं आधारवड बनणारी आपली लेकरं गेली तर आता आपल्या मुलीलाच मुलगा मानलाय या शब्दात माळगे, गुमडेल, आसबे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.
वर्षभर ना सण, ना उत्सव
- - लेकरांच्या जाण्यानं तिन्ही कुटुंबातील सदस्य आजही दु:खाच्या छायेखाली आहेत. सण, उत्सवासारख्या आनंदालाही त्यांनी दूर केलं. पोटच्या गोळ्याप्रमाणे सांभाळलेली ही लेकरं देवाघरी गेली असली तरी केवळ त्यांच्या आठवणींवरच एकेक दिवस कंठीत असतो, अशा भावना व्यक्त करताना माळगे, गुमडेल, आसबे यांच्या नेत्रांमधून अश्रूही टपकत होते.
मुलांचे सवंगडीच हीच आता आमची मुलं...
- - एखादा मित्र गेला तर त्याचा दुसरा मित्र काही दिवसांनी दूर जातो. इथे मात्र संगमेश माळगे, दीपक गुमडेल आणि अक्षय आसबे यांच्याशी साथसंगत करणाºया मित्रांचं आजही आमच्या घरी येणं-जाणं आहे. रघू मेतन, शुभम वारद, फताटे, हेमंत थळंगे, शिवप्रसाद मठ, शरद आनंदकर, गणेश बत्तूल, अक्षय गिराम, धरणे या सवंगड्यांचं आमच्या घरी येणं म्हणजे कुठेतरी आमच्या लेकरांचं दु:ख विसरणं असेच म्हणता येईल. हीच मुलं आता आमची मुलं बनून राहिली आहेत.
तर नोकरीचा राजीनामा दिला असता-माळगे
- - मुलगा तृतीय वर्षात शिकत होता. त्याची हुशारी, कल्पकता पाहता अंतिम वर्ष झाल्यावर हमखास चांगल्या पगाराची नोकरीही मिळणार होती, असा आत्मविश्वासही होता. अंतिम वर्ष उत्तीर्ण झाल्यावर मी शिवशाहीतील नोकरीचा राजीनामा देणार होतो. मात्र नियतीला ते मान्य नव्हते. आता मुलीसाठी मी नोकरी करीत राहणार असल्याचे मडोळप्पा माळगे बोलत होते.