अक्कलकोट : लग्नपत्रिका देवाचरणी ठेवण्यासाठी पुण्याचा नवरदेव दोन मित्रांसह गाणगापूरला निघाला होता. दरम्यान, त्यांच्या कारला ट्रकने समोरून जोरात धडक दिल्याने तिघेही ठार झाले. हा अपघात दि. ८ जून रोजी रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास अक्कलकोट-दुधनी रस्त्यावरील बिंजगेरच्या दर्ग्याजवळ घडला.
दीपक सुभाष बुचडे (वय २९, रा. मांरुजी, ता. मुळशी, जि. पुणे), आकाश ज्ञानेश्वर साखरे (वय २८, रा. हिंजवडी, ता. मुळशी, जि. पुणे) व आशुतोष संतोष माने (वय २३, रा. वाघोली, ता. हवेली, जि. पुणे) असे ठार झालेल्या तिघांची नावे आहेत. याबाबत चंद्रकांत राघूजी बुचडे (वय ४१) यांनी फिर्याद दिली आहे. दीपक बुचडे हा त्याची लग्नपत्रिका देवाचरणी अर्पण करण्यासाठी पुण्याहून मित्रांसमेवत निघाला होता. तुळजापूरला जाऊन ते कारने (एमएच १४ टीएक्स ७८७८) अक्कलकोटला गेले. अक्कलकोटहून गाणगापूरला निघाले होते. रात्री पाऊस सुरू होता. बिंजगेर (ता. अक्कलकोट) शिवारातील शक्करपीर दर्ग्याजवळ दुधनीकडून अक्कलकोटकडे निघालेल्या ट्रकची (क्र. आरजे १४ जीके १७२९) कारला जोरात धडक बसली. त्यात तिघे गंभीर जखमी झाले.
ट्रक चालक त्यांना उपचारासाठी दाखल न करताना ट्रक सोडून पळून गेला. उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर, पोलीस निरीक्षक प्रदीप काळे, पीएसआय काळे, हवालदार रफीक शेख, अजय भोसले, दादाराव पवार, चंद्रजित बेळ्ळे, चालक विजयकुमार मल्हाड आदीजण घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. त्या तिघांना उपचारासाठी पाठविले. मात्र, उपचारापूर्वीच मरण पावल्याचे घोषित करण्यात आले. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रदीप काळे हे करीत आहेत.
.......................
तुळजापूर अन् अक्कलकोटमध्ये दर्शन घेतले
नवरदेवासह तिघांनीही आधी तुळजापूरच्या भवानी मातेच्या चरणी लग्नपत्रिका अर्पण करून दर्शन घेतले. त्यानंतर अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या चरणीही नतमस्तक झाले. त्यानंतर रात्रीच गाणगापूरकडे निघाले होते. मात्र, वाटेत त्या तिघांवर काळाने घाला घातला. नवरदेवाच्या डोक्यावर अक्षता पडण्याअगोदरच त्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
..............
खराब रस्त्यामुळे होतात अपघात
अक्कलकोट ते गाणगापूर सिमेंट काँक्रीट रस्ता अद्याप पूर्ण झालेला नाही. बिंजगेर डोंगरात जड वाहने अक्कलकोटकडे येताना फार अडचणी निर्माण होत आहेत. दोन्ही बाजूला डोंगर आहे. त्या ठिकाणीच रस्ता खराब आहे. पावसाळ्यात तर गाड्या घसरून अनेक छोटे-मोठे अपघात होतात. त्या ठिकाणच्या खराब रस्त्यामुळे मोठा अनर्थ घडल्याने नागरिकांमधून बोलले जात आहे.
..............
मृतांच्या खिशातील पैसे नातेवाईकांना सुपूर्द
अपघातामध्ये मयत झालेल्या आकाश साखरे यांच्याकडे दोन तोळे सोने निघाले होते. तसेच दीपक बचुटे यांच्याकडे २६ हजार ५०० रुपये रोख रक्कम पोलिसांना मिळून आले. ते सर्व मृतांच्या नातेवाईकांना देण्यात आल्याचे हवालदार अजय भोसले यांनी सांगितले. अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
...........