पंढरपूर : माघ वारीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपºयातून दिंड्या-पताकासह ३ लाखांच्यावर भाविक बुधवारी पंढरीत दाखल झाले आहेत. मठ, मंदिर, संस्थाने गजबजली आहेत. पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरच्या पुढे गेल्याने भाविकांना दर्शन घेण्यासाठी आठ तासांचा वेळ लागत आहे.दर्शन रांगेत भाविकांसाठी उपवासाचे पदार्थ व चहापाण्याची सोय मोफत करण्यात आल्याचे मंदिर समितीने सांगितले.
पदस्पर्श दर्शन रांगेत सुमारे सत्तर हजार भाविक उभे असून, रांग गोपाळपूरच्या पुढे पोहोचली आहे. दरम्यान, माघी एकादशीदिवशी श्री विठ्ठलाची नित्यपूजा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांच्या हस्ते सपत्नीक तर श्री रुक्मिणी मातेची नित्यपूजा लेखाधिकारी सुरेश कदम यांच्या हस्ते सपत्नीक पहाटे संपन्न झाली.
माघ वारीनिमित्त पंढरीत येणाºया दिंडी व फडकरी मंडळींनी ६५ एकर परिसरात आपल्या राहुट्या, तंबू ठोकून वास्तव्य करत असल्याने ६५ एकराला भक्तिसागरचे रूप आले आहे. यात्रेच्या सोहळ्यानिमित्ताने पंढरीतील रस्ते गर्दीने फुलले आहेत. भक्तिमार्ग, प्रदक्षिणा मार्ग व मंदिर परिसर गर्दीने फुलून गेला आहे. दर्शनासाठी भाविकांना आठ तासांचा वेळ लागत आहे.
सुरक्षा बंदोबस्ताची जबाबदारी दीड हजार पोलीस कर्मचारी पार पाडत आहेत. वारीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेण्यासाठी एसटी बस, रेल्वे, खासगी वाहनांनी भाविक पंढरीत दाखल होत आहेत. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक शाखेच्या वतीने चोख नियोजन करण्यात आले असून, वारी भाविकांना अधिकाधिक सुखकर करण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.राज्यातील विविध भागांतून आलेल्या भाविकांनी मुखदर्शन त्याचबरोबर पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली आहे़ मंदिर समितीचे अध्यक्ष विठ्ठल जोशी व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर समितीच्या वतीने उभारण्यात आलेल्या दर्शन रांगेत भाविकांना ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण व्हावे म्हणून वॉटरप्रूफ दर्शन रांग तयार करण्यात आलेली आहे. तर दर्शन रांगेत पत्राशेड येथे कायमस्वरुपी चार पत्राशेड व तात्पुरते नव्याने उभारण्यात आलेले दोन असे सहा दर्शन शेड मंगळवारी भाविकांनी भरून गेले होते. दर्शन रांग दर्शन शेडमधून बाहेर पडून गोपाळपूरच्या दिशेने सरकू लागली आहे. पंढरीत पदस्पर्श दर्शन रांगेत ६० हजारांवर भाविकांची गर्दी दिसून आली.
दर्शन रांगेत घुसखोरी होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दर्शन रांगेत भाविकांना शुध्द पिण्याचे पाणी, प्रथमोपचार सेवा, शौचालये, वीज व्यवस्था, लाऊड स्पीकर, सीसीटीव्ही कॅमेरे या सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत़ मागील वर्षीच्या माघी यात्रेचा विचार करता यावेळी कमी भाविक येतील असा प्रशासनाचा अंदाज असल्याने दर्शन रांगेत ६ दर्शन शेड उभारण्यात आले. मात्र हे शेड व दर्शन रांगही भाविकांना अपुरी पडत असल्याचे दिसून येते. दर्शन रांगेत उभारलेल्या भाविकांकडून विठ्ठल नामाचा जयघोष सुरु असून, भक्तिमय वातावरण आहे.
राज्यातील भाविकांची दर्शनासाठी झुंबड- राज्यभरातून तसेच आसपासच्या भागातून आलेल्या भाविकांनी चंद्रभागा वाळवंटात सुरू असलेल्या भजन, कीर्तन प्रवचनाचा लाभ घेत अनेकांनी रात्र चंद्रभागा वाळवंटात जागून काढली. तर पहाटेपासून स्नान करण्यासाठी भाविकांची चंद्रभागेत गर्दी उसळली आहे. चंद्रभागा स्नानानंतर मुखदर्शन तसेच पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी भाविकांची एकच झुंबड उडाली आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांसाठी पिण्याचे शुद्ध पाणी तसेच महाप्रसादाचे वाटप करण्यात येत आहे. भाविकांना लाऊड स्पीकरवरून आवश्यक त्या सूचना देण्यात येत आहेत. रांग जलद पुढे जावी, यासाठी खासगी सुरक्षा रक्षकांची मदत घेण्यात येत आहे.- विठ्ठल जोशी, कार्यकारी अधिकारी, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर