सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने गुरुवारी सोलापूर-हैदराबाद रोडवर तीन दुचाकीस्वारांना हातभट्टी दारूची वाहतूक करताना पकडले.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मुळेगाव तांडा (ता. दक्षिण सोलापूर) या हातभट्टी दारु निर्मिती ठिकाणावरून सोलापूर शहरात दारुचा पुरवठा करणाऱ्या तीन मोटारसायकली पकडल्या. या कारवाईत भरारी पथकाने सोलापूर-हैदराबाद रोडवर पाळत ठेवून बालू काशिनाथ पवार (वय ३९) यास पाच रबरी ट्यूबमध्ये हातभट्टी दारु त्याच्या एमएच १३ सीजी ४७६१ वरून वाहतूक करताना पकडले. तसेच सुरेश शंकर राठोड (वय ४०) यास पाच रबरी ट्यूबमध्ये हातभट्टी दारू त्याच्या एमएच १३ डीएस ९२०९ वरून वाहतूक करताना ताब्यात घेतले. एका अन्य कारवाईत गोविंद बाबू चव्हाण (वय ३९) याला एमएच १३ डीएन ७४२८ वरून हातभट्टी दारूची वाहतूक करताना पकडून तिन्ही आरोपींच्या ताब्यातून ५७ हजार ४०० रूपये किमतीच्या दारूसह एकूण २ लाख ५७ हजार ४०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक सुरेश झगडे, शिवकुमार कांबळे, जवान अशोक माळी, नंदकुमार वेळापुरे, अण्णा कर्चे व वाहनचालक दीपक वाघमारे यांच्या पथकाने पार पाडली.