शंकर हिरतोट
दुधनी : गणेशोत्सव काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. त्यासाठी गणेश मूर्ती तयार करण्याचे काम अक्कलकोट-गाणगापूर रस्त्यावरील एमआयडीसीमध्ये युद्धपातळीवर चालू आहे.
एमआयडीसीतील आॅईल मिल, आईस फॅक्टरी, पाईप कारखाना आदी व्यवसायांवर संक्रांत आल्याने संपूर्ण व्यवहार ठप्प होऊन एमआयडीसी बंद पडण्याच्या मार्गावर होते. अशा परिस्थितीत कुंभार गल्लीत छोटेखानी व्यवसाय करणाºयो काही लोकांनी बंद पडलेल्या आॅईल मिलचे गोदाम भाडेतत्त्वावर घेऊन गणेशमूर्ती बनविण्याचा व्यवसाय सुरू केला आहे.
बसवराज भीमाशंकर कुंभार, दत्तात्रय लक्ष्मण कुंभार, शरणप्पा लक्ष्मण कुंभार, रेवणसिद्ध लक्ष्मण कुंभार, मल्लिनाथ सिद्राम कुंभार, रेवणसिद्ध सिद्राम कुंभार, महादेव सिद्धप्पा कुंभार या सात लोकांनी मिळून सात ठिकाणी मोठ्या प्रमाणात गणेशमूर्ती बनविण्याचे काम सुरू केले आहे. राहण्याच्या आणि जेवणाच्या व्यवस्थेसह दहा ते बारा हजार रुपयांपर्यंत पगार दिला जातो. यामुळे परप्रांतिय कारागिरांना रोजगार मिळण्यासोबतच स्थानिक व्यवसायालाही चालना मिळत आहे. मात्र त्यासाठी शासकीय अर्थसाहाय्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
बाहेरील कारागिरांना रोजगार- कुंभार गल्लीतून एमआयडीसीत स्थलांतर झाल्याने दोन फुटापासून ते दहा फुटापर्यंत गणेशमूर्ती बनविण्याकरिता सोलापूरसह नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील बडुर गावातील कारागिरांना आणून गेल्या अकरा महिन्यांपासून मूर्ती बनविण्याचे काम सुरू आहे. या सात ठिकाणी मिळून दीडशे ते दोनशे कारागीर आहेत.
महागाईचा फटका- व्यवसायाचा पसारा वाढल्याने त्यानुसार गणेश मूर्तींसह इतर मूर्ती बनविण्यासाठी लागणारे पीओपी राजस्थानातून, कात्या हैदराबाद येथून खरेदी करावा लागतो. तसेच पुणे, मुंबई, कोल्हापूर येथून रंग खरेदी करावे लागतात. मात्र त्यांच्या किमतीमध्ये भरमसाट वाढ झाल्याने कारागिरांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
गणेशमूर्तींना परराज्यातून मागणी- अक्कलकोटच्या एमआयडीसीत तयार होणाºया विविध प्रकारच्या गणेश मूर्तींसह शिवाजी महाराज, बसवेश्वर, देवीची मूर्ती विविध कथांवर आधारित मूर्ती यांसह अनेक मूर्तींना सोलापूरसह गुलबर्गा, विजयपूर, रायचूर, बीदर, यादगीर, लातूर, उस्मानाबाद, हैदराबाद, तेलंगणा, तामिळनाडू यांसह अनेक राज्यात मोठ्या प्रमाणात बनवून दिल्या जातात.