सोलापूर : एकोणीस महिन्यांपासून रखडलेला यंत्रमाग कामगारांच्या वेतनवाढीचा करार अखेर मंगळवारी रात्री झालेल्या बैठकीत करण्यात आला. १०० कार्डास दहा पैसे वाढविण्याचा निर्णय कामगार संघटना आणि यंत्रमागधारक संघाच्या पदाधिकाºयांनी घेतला. तीन कामगार संघटनांनी नवा करार मान्य केला. लालबावटाने मात्र या करारास विरोध करून संपाच्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले.
२०१६ साली शेवटचा वेतन करार झाला होता. तो २०१७ साली संपला. यानंतर पुढे एकोणीस महिने वेतनवाढीचा करारच झाला नाही. २०१८ साली नव्याने करार करण्यासाठी संघटनांनी प्रयत्न केला, परंतु भविष्य निर्वाह निधी कार्यालयामार्फत यंत्रमाग कामगारांना पीएफ लागू करण्याचा आदेश दिल्यामुळे कधी नव्हे कारखानदारांनी बेमुदत बंद पुकारला. या गोंधळात वेतनवाढीचा करार राहून गेला.
२०१९ साली मजुरीवाढीसाठी कामगार संघटनांनी पुन्हा आंदोलन सुरू केले. मनसेप्रणित कामगार संघटनेच्या वतीने सहायक कामगार आयुक्तांकडे यासाठी वारंवार निवेदन आणि आंदोलन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन वेतनवाढीच्या सूचना खुद्द जिल्हाधिकाºयांनी दिल्या होत्या. अखेर या प्रश्नावर मंगळवारी तोडगा निघाला. मनसेप्रणित यंत्रमाग संघटना, कामगार सेना आणि भारतीय कामगार संघटना या तिन्ही संघटनेचे पदाधिकारी आणि यंत्रमागधारक संघाचे पदाधिकारी यांच्यात यंत्रमागधारक संघात झालेल्या बैठकीत वेतनवाढीचा नवा करार करण्यात आला.
१०० कार्डास १० पैसे अशी वेतनवाढ करण्यात आली आहे. साधारण दररोज ३० ते ३५ रुपये आणि महिन्याकाठी ८०० ते हजार रुपये मजुरीत वाढ होणार आहे. त्याचबरोबर जॉब प्रोसेसिंग म्हणजे जॉबर, मुनीम, घटी काटा करणाºया कामगारांना मासिक किमान ५०० रुपये वेतनवाढ करण्याचा निर्णय या कराराद्वारे घेण्यात आला आहे.
या बैठकीस यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, अंबादास बिंगी, मल्लिकार्जुन कमटम, नारायण आडकी, मनसे कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष श्रीधर गुडेली, विठ्ठल बोडा, नागनाथ केदारी, सदानंद जडल यांच्यासह कामगार संघटनांचे प्रतिनिधी आणि कारखानदार उपस्थित होते.
लाल बावटाचा विरोध; संपावर ठाम- लालबावटा यंत्रमाग कामगार संघटनेने हा करार अमान्य केला असून सर्व कामगारांना विश्वासात न घेता यंत्रमागधारक संघाच्या पदाधिकाºयांनी मुद्दाम हा करार केला आहे. तो सिटूला मान्य नाही. यंत्रमाग कामगारांना किमान ५० टक्के मजुरीवाढ मिळाली पाहिजे, या भूमिकेवर आम्ही ठाम असून या मागणीसाठी २८ फेब्रुवारीपासून बेमुदत संप पुकारण्यात येणार असल्याचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी सांंगितले आहे.
तीन कामगार संघटनांनी एकत्र येऊन हा करार मान्य केलेला आहे. करारात ठरल्याप्रमाणे मजुरीवाढ सर्वच कारखानदार देतील. गेल्यावेळीही तीनच संघटनांनी हा करार मान्य केला होता. - पेंटप्पा गड्डमअध्यक्ष, यंत्रमागधारक संघ