वाखरी ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यामधील तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत, तर १४ जागांसाठी ३६ उमेदवार प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात आहेत. आमदार परिचारक, स्व. आ. भालके, काळे गटाने स्थानिक गटांना सोबत घेऊन आघाड्या केल्याने दुरंगी लढत होत असून, एकाच नेत्याचे दोन गट आघाडीच्या माध्यमातून समोरासमोर उभे ठाकल्याचे चित्र आहे.
काही जागांवर अपक्ष उमेदवारांची उमेदवारी निर्णायक ठरणार असल्याने त्याचा फायदा, फटका कोणाला बसणार, याची समीकरणे जुळवत आपला उमेदवार कसा निवडून येईल, यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. विविध आश्वासनांवर रंगलेला प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे.
बिनविरोध तीन जागांमध्ये संजय अभंगराव, उमाबाई जगताप या दोन उमेदवारांचा समावेश आहे, तर भालके-काळे आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज अवैध ठरल्याने एक जागा बिनविरोध झाली आहे. सध्या १४ जागांसाठी ३६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. प्रभाग क्र. ४ मध्ये अपक्ष उमेदवार निर्णायक ठरणार असल्याची चिन्हे आहेत, तर प्रभाग क्र. २, ४, ५ मधील तुल्यबळ लढतीकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे. दोन्ही आघाड्यांनी तगडे उमेदवार दिल्याने निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. प्रभाग क्र. १, ५, ६ मध्ये अपक्षांची उमदवारी निर्णायक ठरणार आहे.
विठ्ठल-पांडुरंग परिवारातही विभागणी
वाखरी ग्रामपंचायतीसाठी विठ्ठल आणि पांडुरंग परिवारात प्रमुख लढती होत आहेत. यामध्ये स्व. आ. भालके व काळे यांच्या नेतृत्वाने चालत असलेला विठ्ठल परिवार व आ. परिचारक यांच्या पांडुरंग परिवाराचे गावात दोन-दोन गट आहेत. त्या गटांनी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एकत्र येणे शक्य झाले नाही. यामधील एका गटाने विठ्ठल परिवारासोबत तर दुसऱ्या गटाने शिवसेनेसह विठ्ठल परिवारातील एक गट सोबत घेतला आहे. त्यामुळे कोण कोणत्या गटाकडून लढत आहे, हे समजून घेताना कार्यकर्त्यांचीही दमछाक होत असल्याने निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे.