बार्शी : सुगंधी चंदनाची झाडे तोडून दुचाकीवरून घेऊन जाणाऱ्या तिघांना वैराग पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून ८० हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. या तिघांना वैराग पोलिसांनी बार्शीचे येथील न्यायालयात हजर केले असता न्यायदंडाधकारी आर.एस. धडके यांनी ३० डिसेंबरपर्यंत कोठडी सुनावली.
दीपक हनुमंत काळे (४२), शत्रुघ्न नजित काळे (२१) आणि वासुदेव अजित काळे (३१, तिघे रा. सारोळे, ता. बार्शी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, २६ डिसेंबर रोजी दुपारी कासारी-भांडेगाव मार्गावर पोलिसांनी ही कारवाई केली.
हे तिघेजण दुचाकीवरून (क्र. एमएच २५ एक्यू ७८३७) १२ किलो चंदनाची ओली सुगंधी लाकडं पोत्यात भरून घेऊन जात होते. वैराग पोलिसांनी याची माहिती मिळताच सापळा लावून त्या तिघांना ताब्यात घेतले.
याबाबत वैरागचे पोलीस पंडित गवळे यांनी फिर्याद दिली असून, त्या तिघांकडून दुचाकीसह चंदनाची लाकडं जप्त केली.
--
अपघाताच्या तपासाला गेले अन् चंदन पकडले
कासारी- भांडेगाव मार्गावर अपघात झाला असून, एकाचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या अपघातस्थळी पाहणीसाठी निघालेल्या पोलिसांना याच मार्गावरून चंदनाची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. वैराग सहायक पोलीस निरीक्षक परजणे, पोलीस नाईक लोकरे यांच्या पथकाने सापळा लावला. यावेळी संबंधित तीनही आरोपी मिरझनपूर येथून चंदनाची तस्करी करून घेऊन जाताना सापडले. त्यांची दुचाकी थांबवून तपासणी केली असता एका पोत्यात चंदनाची लाकडं आढळली.