सोलापूर जिल्ह्यामध्ये १२ नगर परिषदा होत्या. मात्र, मागील महिन्यात अकलूज, महाळुंग, वैराग व नातेपुते या चार ग्रामपंचायतींना नगर पंचायतीचा दर्जा देण्यात आला आहे. वॉर्डात मतदार संख्या मर्यादित असते. त्यामुळे अनेकांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वाॅर्डात विविध कार्यक्रम, कोरोनाकाळात लोकांना मदत केली होती. वाॅर्डातील मर्यादित मतदार संख्येमुळे आर्थिक खर्चदेखील उमेदवारांना परवडणारा असतो. मात्र, वाॅर्डनिहायऐवजी प्रभागनिहाय निवडणुका झाल्यास एका प्रभागात अधिक मतदार असणार आहेत. नव्या इच्छुक कार्यकर्त्यांना व अपक्ष उमेदवारांना आर्थिक सांगड घालणे कठीण होणार आहे. आपल्या वाॅर्डात सक्षम असलेल्या कार्यकर्त्यांना पक्षाकडून उमेदवारी नाही मिळाली तर प्रभागात मतदार जादा असल्याने निवडणूक लढवणे अवघड होणार आहे.
...............
असा असणार मतदान अधिकार
महानगरपालिकेत तीन वाॅर्डांचा एक प्रभाग असणार आहे. त्याचबरोबर अ व ब वर्ग असलेल्या नगर परिषदेत दोन वाॅर्डांचा एक प्रभाग आहे. यामुळे येथील मतदारांना एका वेळी दोन उमेदवारांना मतदान करण्याचा अधिकार मिळणार आहे. तर क वर्ग असलेल्या नगर परिषदेत वाॅर्डनिहाय प्रभाग रचना आहे. यामुळे येथील मतदारांना एकाच उमेदवाराला मतदान करता येणार आहे.
.............
वर्गनिहाय नगर परिषद
बार्शी - अ, पंढरपूर - ब, अक्कलकोट - ब, करमाळा ( क), दुधनी (क), मंगळवेढा (क), सांगोला (क), माढा (क), मोहोळ (क), कुर्डुवाडी ( क), मैदर्गी (क), माळशिरस - क, श्रीपूर- माहळुंग - क, अकलूज (क) , वैराग (क), नातेपुते (क)
..............
अगामी नगरपालिका निवडणुका वाॅर्डनिहाय झाल्या, तर सर्वांचा फायदाच होईल. मोठ्या प्रभागात नगरसेवक आणि नागरिक यामधील संवादाचा अभाव दिसतो. छोट्या वाॅर्ड रचनेमध्ये नगरसेवक ही चांगले काम करू शकतील.
-योगेश आधटराव, नागरिक, पंढरपूर
...................
प्रभागनिहाय निवडणुका होणार असल्याने पक्षनिहाय निवडणुका होतील. याचा फायदा निधी उपलब्ध करून घ्यायला होणार आहे. यामुळे शहराच्या विकासाला अधिक निधी मिळून शहराचा मोठ्या प्रमाणात विकास होईल.
- मुकुंद पवार, प्राध्यापक, पंढरपूर
..........
सरकारने योग्य निर्णय घेतला आहे. यामुळे प्रत्येक प्रभागात दोन उमेदवार राहतील व नागरिकांचे प्रश्न अधिक सुटले जातील. नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी प्रतिनिधी सहजरीत्या उपलब्ध होतील.
-सुधीर अभंगराव, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना
.........................
राज्य सरकारने स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन पक्ष आहेत. त्यामुळे याचा फायदा आघाडी सरकारला निश्चित होऊ शकतो.
-उमेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस
.....................
दोन उमदेवार एका प्रभागात असतील त्या प्रभागातील विकास कामे, रस्ता, ड्रेनेज व अन्य कामे अधिक चांगल्यारीत्या मार्गी लागतील. शहराच्या विकासासाठी प्रभागनिहाय निवडणुका होणे गरजेचे आहे.
-धवलसिंह मोहिते पाटील, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस
......................
वाॅर्डनिहाय उमेदवार असल्यास जबाबदारी निश्चित होते. प्रभाग रचना असल्यास जबाबदार कोणाला धरायचे, काम कोणाला सांगायचे, याबाबत नागरिक अस्वस्थ असतात. वाॅर्डनिहाय निवडणूक झाल्यास महाविकास आघाडीचा निभाव लागणार नाही.
-श्रीकांत देशमुख, जिल्हाध्यक्ष, भाजप