२५२ पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक लागली होती. १७ एप्रिल रोजी मतदान झाले. ५२४ मतदान केेंद्रात ३ लाख ४० हजार ८८९ मतदरांपैकी २ लाख २५ हजार ४८५ मतदरांनी मतदान केले. यामध्ये १ लाख २० हजार ६८४ पुरुष व १ लाख ४ हजार ८०१ स्त्री मतदरांचा समावेश आहे.
या पोटनिवडणुकीची मतमोजणी २ मे रोजी होणार आहे. यामुळे कोण विजयी होणार, हे २ मे रोजीच घोषित करण्यात येणार आहे. मतदान व मतमोजणीमध्ये १६ दिवसांचा कालावधी आहे. या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, नि:पक्ष निकाल लागावा या उद्देशाने मतपेट्या ठेवण्यात आलेल्या शासकीय गोडाऊनला त्रिस्तरीय बंदोबस्त लावण्यात आला आहे.
---
असे आहे फौजफाटा
यामध्ये मतपेट्या नजीक सीआरपीएफचे पथक, गोडाऊनमध्ये एसआरपीएफ तर गोडाऊन बाहेर राज्य पोलीस कर्मचारी नेमण्यात आले आहेत. या बंदोबस्तात १ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक व कर्मचारी असे एकूण ५० जण आहेत. दिवसा वेगळा व रात्री वेगळा असा दोन टप्प्यात बंदोबस्त असणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले.
फोटो ::::::::::::::::
मतपेट्यांच्या संरक्षणासाठी नेमण्यात आलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी. (छाया : सचिन कांबळे)