याबाबत शहर पोलिसात अंजिक्य श्रीकांत पिसे यांनी तक्रार देताच पोलिसांनी खरेदी देणारे सोमनाथ रमाकांत पिसे (रा. सुभाषनगर बार्शी), तर संगनमताने व्यवहार करणारे सतीश श्रीमंत आरगडे (रा. तावडी), आबासाहेब जराड (रा. बार्शी) व साक्षीदार अनिल वायचळ बार्शी, संजय विलास आरगडे (रा. तावडी) यांच्या विरुद्ध भादंवि ४२०, ४६७, ४६८, ४७१ व १२० ब प्रमाणे गुन्हा नोंदला होता.
याबाबत अधिक माहिती अशी, माजी नगराध्यक्ष कै. श्रीकांत रमाकांत पिसे व त्यांच्या आई-वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर एकत्रित कुटुंबाच्या मालकीच्या १६१ मिळकतींचे रीतसर वाटप होण्यासाठी अजिंक्य श्रीकांत पिसे यांनी बार्शी न्यायालयात दावा दाखल करून मागणी केली आहे. यापैकी गट नं.५१४/१ या मिळकतीच्या वाटपाचा दावा चालू असताना सोमनाथ पिसे यांनी सहकर्जदार म्हणून बारामती बँकेकडून ३ कोटी रुपये कर्ज घेऊन त्यावेळी बँकेचा बोजा नसल्याचे व तलाठ्यांचा बनावट दाखला व बँकेचे बनावट कागदपत्र सही-शिक्के व दस्तऐवज तयार करून संगनमताने बँकेबरोबर फिर्यादीचीही फसवणूक करून जागेचा व्यवहाराचा दस्त २ मार्च २०२१ रोजी नोंदविला होता.
त्यामुळे याबाबत पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा नोंदताच वरील तिघांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला.
यात फिर्यादीतर्फे ॲड. सोहम मनगिरे तर सरकारतर्फे ॲड. दिनेश देशमुख यांनी युक्तिवाद करताना याप्रकरणी सखोल तपास करावयाचा असल्याने त्यांना पोलीस कस्टडीची गरज असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणले. यावर तिघाचा अटकपूर्व जमीन नामंजूर केला. पुढील तपास सपोनि. अमोल ननवरे करत आहेत.