सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे ओढ्याच्या पुलावर आलेल्या पाण्यात मंगळवारी मध्यरात्रीनंतर दुचाकीवरून पुल ओलांडत असलेले तिघे जण पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेले असल्याचे माहिती समोर आली आहे. यातील दोघे बचावले असून एक जण बेपत्ता असल्याची माहिती अग्निशामक दलाने दिली.
सोलापुरात रात्रभर जोरदार पाऊस सुरू होता. हवामान विभागाने सांगितल्यानुसार रात्रभर पडलेल्या पावसाची टक्केवारी ३७.४ मिमी एवढी नोंद झाली आहे. दरम्यान, ज्ञानेश्वर संभाजी कदम, बबन संदीपान जाधव आणि महादेव रेड्डी अशी त्या तिघांची नावे आहेत. त्यापैकी बबन जाधव आणि महादेव रेड्डी यांना पुराच्या पाण्याबरोबर वाहून जात असताना ओढा प्रवाहातील झाडांना पकडून स्वतःला वाचविण्यात यश आले तर ज्ञानेश्वर कदम सकाळपर्यंत मिळून आला नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
सध्या बेपत्ता असलेल्या ज्ञानेश्वरचा शोध अग्निशामक दलाचे जवान घेत आहेत. सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले असून ग्रामस्थांनी मोठी गर्दी घटनास्थळावर झाली आहे.