मोहोळ : घरफोडीसह चारचाकी वाहने पळवणा-या तिघांना उस्मानाबाद जिल्ह्यात भूम परिसरात शिताफीने पकडले. या तिघांनी मोहोळसह पंढरपूर व पुणे परिसरात केलेल्या चोऱ्या मोहोळ पोलिसांनी उघडकीस आणले असून या तिघांकडून लॅपटॉप, मोटारसायकलसह जीप जप्त केली. जवळपास पाच लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त करीत तिघांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
शिवसनी वचिष्ठा काळे (रा.भूम, जि उस्मानाबाद), महमदया उर्फ महमद अन्वर शेख, रवी उर्फ हाड्या मधुकर पवार (दोघे रा. ढोकबाभुळगाव, ता. मोहोळ) असे अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. प्राथमिक चौकशीत या तिघांनी मोहोळ परिसरात गुन्हे केल्याची कबुली दिली.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीतील आरोपी हे भूम, परंडा परिसरात वावरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांना मिळाली होती. पोलीस नायक शरद ढावरे, गणेश दळवी, पांडुरंग जगताप, हरीदास थोरात, लखन घाडगे व हेड कॉन्स्टेबल सचिन माने या डीबी पथकाने सापळा रचला. सायबर सेलचे पोलीस कॉन्स्टेबल रवी हटकिले यांच्या मदतीने परांडा, अंबेजोगाई, भूम या ठिकाणी जाऊन शोध घेतला. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता पंढरपूर व यवत (जि.पुणे) येेथेही चोऱ्या केल्याचे उघडकीस आणले. त्यांच्याकडून दोन लॅपटाप, दोन एल ई.डी. दोन मोटर सायकली, बोलेरो जीप जप्त केली. अधिक तपास हेड कॉन्स्टेबल शरद ढावरे करीत आहेत.
---
फोटो : २१ मोहाेळ क्राईम
मोहोळ परिसरात चोऱ्या करणा-या तिघांना पोलिसांच्या पथकाने भूम येथे पकडले. त्यांच्याकडून वाहनांसह लॅपटॉप जप्त केले.