पालघर जिल्ह्यातील वसई येथील कुवर महंमद नादिर व त्यांचे मित्र नितीन पांचाळ व चालक उमाशंकर बसवराज यादव हे तिघे जण (कार क्र : एमएच- २, इआर ५३४४) गाडीतून तुळजापूर येथे दर्शनासाठी निघाले होते. दरम्यान, दि. १६ सप्टेंबर रोजी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास मोहोळ - वैराग रोडवर नरखेड परिसरात भोयरे पाटीजवळ गाडी लघुशंकेसाठी थांबवली असता अचानक चेहऱ्याला मास्क बांधलेले सहा ते सात इसमांनी गाडीला घेराव घातला व गाडीतून चालक उमाशंकर बसवराज यादव, नितीन पांचाळसह फिर्यादी नादिर यास बाहेर ओढून यांच्या खिशातील ९७ हजार ५०० रुपयांच्या रोख रकमेसह तीन मोबाइल व एक घड्याळ असा एकूण एक लाख १८ हजार ५०० ऐवज चोरून पोबारा केला असल्याची फिर्याद कुवर नादिर यांनी दिली आहे. या फिर्यादीनुसार एका महिलेसह एकूण सात संशयित आरोपींवर मोहोळ पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोक सायकर करीत आहेत.
लघुशंकेसाठी थांबलेल्या तिघांना घेराव घालून लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 4:28 AM