- संजय बोकेफोडे कुसळंब (जि. सोलापूर) : बार्शी तालुक्यातील पांगरी हद्दीत फटाके निर्मिती कारखान्यात आग लागून झालेल्या दुर्घटनेत तीन महिलांचा भाजून जागेवरच मृत्यू झाला, तर तीन गंभीर जखमी झाल्या. नववर्षाच्या पहिल्या दिवशी दुपारी दुर्घटना घडली. मृतांपैकी दोघींची ओळख पटली आहे. सुमन ऊर्फ सुमित्रा ज्ञानोबा जाधवर (५६) व गंगाबाई मारुती सांगळे (५०) अशी मृतांची नावे आहेत.
कारखान्यात सतत स्फोट होत असल्याने जखमींचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या. कौशल्या सुखदेव बगाडे (३०, रा. पांगरी), मोनिका संतोष भालेराव (३०, रा. वालवड) या दोन जखमींना उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात हलविले आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे. शकुंतला कांबळे (३०, रा. पांगरी) या किरकोळ जखमी झाल्या असून, त्यांच्यावर पांगरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सतत स्फोट झाले, आग परिसरात पसरत गेलीपांगरीपासून तीन किलोमीटर अंतरावर युसूफ हाजी मणियार (रा. पांगरी) यांच्या मालकीचा इंडियन फायर वर्क्स या नावाने फटाके निर्मितीचा कारखाना आहे. या कारखान्यात दैनंदिन चाळीस ते पन्नास कामगार काम करत असतात. मात्र, रविवारी पांगरी गावचा आठवडी बाजार असल्याने कारखान्यात ९ महिला व कारखान्याबाहेर दोन पुरुष काम करत होते. दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास कारखान्यात अचानक स्फोट झाला. परिसरातील दोन गावांमध्ये फटाक्यांचा आवाज जात होता. आगीने उग्ररूप धारण केल्यामुळे परिसरात आग पसरत गेली.
७ अग्निशमन गाड्या दाखलबार्शी नगरपालिका, उस्मानाबाद नगरपालिका, सोलापूर, इंद्रेश्वर साखर कारखाना, बबनराव शिंदे साखर कारखाना आदी वेगवेगळ्या सात अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत होत्या, तर शहर व तालुक्यातील सुमारे १२ सरकारी व खासगी रुग्णवाहिका दाखल झालेल्या होत्या.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली माहितीया घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती घेतली. फडणवीस यांनी मयत आणि जखमींना योग्य ती शासकीय मदत मिळवून देऊ, असे आश्वासन दिल्याचे आमदार राजेंद्र राऊत यांनी सांगितले.