सोलापूर : अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. महसूल विभागाच्या भरारी पथकाच्या मदतीने सांगोला पाणीपुरवठा योजना, इसबावी येथे अवैधरीत्या साठविलेली २० ब्रास वाळू जप्त करून तीन लाकडी होड्या जेसीबीच्या साहाय्याने नष्ट करण्यात आल्या आहेत.
पंढरपूर तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी गजानन गुरव व तहसीलदार सुशील बेल्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार मनोज श्रोत्री यांनी ही कारवाई केली आहे. भीमा नदीपात्रातील सांगोला पाणीपुरवठा योजना, इसबावी येथे अवैध वाळूसाठा असल्याची, तसेच भीमा नदीपात्रावरील रेल्वे पुलाखाली ५० पोती अवैध वाळूसाठा केल्याची माहिती महसूल प्रशासनास मिळाली.
शुक्रवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास अवैध वाळूसाठा केल्याचे निर्देशनास आले. भरारी पथकाद्वारे धडक कारवाई करण्यात आली. यामध्ये २० ब्रास वाळू जप्त करून शासकीय धान्य गोदाम, पंढरपूर येथे ठेवण्यात आली आहे. तसेच भीमा नदीपात्रावरील रेल्वे पुलाखाली ५० पोती अवैध वाळूसाठा केलेली वाळू नदीपात्रात टाकण्यात आली व तीन लाकडी होड्या जेसीबीच्या साहाय्याने पूर्णपणे नष्ट करण्यात आल्याचे नायब तहसीलदार श्रोत्री यांनी सांगितले.
या भरारी पथकात मंडळ अधिकारी विजय शिवशरण, तलाठी राजेंद्र वाघमारे, प्रशांत शिंदे, तपसे, महसूल सहायक सचिन शेंडगे, सुभाष परळकर, सुरेश कदम, कोतवाल शिवा सलगर, लिंगा मदने, मसा वाघमारे, बाळू कांबळे, काकासाहेब कांबळे सहभागी होते.