भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सोलापुरात अज्ञात युवकाने दगडफेक केल्याची घटना बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. आमदार गोपीचंद पडळकर हे सोलापूर दौऱ्यावर घोंगडी बैठकीसाठी आले होते. सायंकाळी जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एसबीआय कॉलनी, मड्डे वस्ती भागात बैठकीसाठी आले असता अज्ञात युवकाने त्याच्या गाडीवर दगडफेक केली. या संपूर्ण प्रकारानंतर पडळकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून कोणी गोळ्याही घातल्या तरी विचारांपासून मागे हटणार नसल्याचं पडळकर म्हणाले.
"मड्डे वस्तीत झालेल्या बैठकीनंतर मी गाडीत बसलो. गाडी वीस पावलंही पुढे गेली नाही तर गाडीवर दगड टाकला आणि ते लोक पळून गेले. या ठिकाणी माझी कोणाशी ओळख नाही, शत्रूत्व नाही. ज्यांनी कोणी केलं असेल किंवा ज्यांना कोणी करायला लावलं असेल त्यांना राज्यातील लोकं जाणतायत," अशी प्रतिक्रिया पडळकर यांनी दिली. टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी साधलेल्या संवादात त्यांनी यावर भाष्य केलं. राष्ट्रवादीचा असा पहिल्यापासूनचा उद्योग सुरू आहे. कोणालातरी पुढे करायचं आणि त्याचं चित्र वेगळं दाखवायचं. मला रोज त्यांचे फोन येतात, मेसेज येतात. परंतु मी त्यांना उत्तर देत नाही. हे कोणी केलं हे माहित नाही. पोलीस तपास करतील. परंतु हा भाग त्यांचाच असावा असा आपला अंदाज असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
"मी स्वत: या संदर्भातील तक्रार देणार नाही. आज माझा आवाज बंद करण्यासाठी गाडीवर दगडफेक करणार असेल, याला मी भीती वगैरे दाखवावी असा गैरसमज झाला असेल, उद्या मला गोळ्या जरी घातल्या तरी मी या विषयात माघार घेणार नाही," असंही पडळकर यांनी स्पष्ट केलं.
यापूर्वी शरद पवारांवर केली होती टीका"शरद पवार हे साडेतीन जिल्ह्यांचे स्वामी आहेत. ज्यांचे तीन खासदार आहेत, त्यांना मोठं कोण मानणार. तुम्ही मानणार असाल तर मला त्याचं देणंघेणं नाही," असं म्हणत पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. "ही लोकशाही आहे. या राज्यात भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष आहे. या राज्यात सर्व ओबीसी समाजापर्यंत जाणं हे माझं काम आहे. मला ओबीसींचा नेता म्हणावं असं माझं म्हणणं नाही," असं पडळकर यांनी स्पष्ट केलं. "महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून समाजात तेढ वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. मूठभर लोकांकडून बहुजनांचा आवाज दाबला जात आहे. ओबीसींना दिलेले संविधानिक अधिकार हिसकावून घेण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यांच्या संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे," असं त्यांनी नमूद केलं.