नारायण चव्हाणसोलापूर : पैठण येथील जायकवाडी धरणाशेजारील संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या धर्तीवर उजनी धरणाजवळील भीमानगर येथे उद्यान आणि पर्यटनस्थळ उभारण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. त्यासाठी तांत्रिक सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली असून, पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकाºयांनी नियोजित जागेची पाहणी केली आहे. लवकरच उजनीजवळ थुई थुई कारंजे या उद्यानाच्या माध्यमातून उडणार आहेत.
उजनी धरणसोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरले आहे. या धरणामुळे सोलापूर, पुणे, नगर, जिल्ह्यातील २ लाख ४९ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र ओलिताखाली आले आहे. उजनी धरणाखाली भीमानगर येथे १२ मेगावॅट क्षमतेचा वीजनिर्मिती प्रकल्पही उभारण्यात आला आहे. जलसिंचन आणि वीजनिर्मिती बरोबर उजनी प्रकल्पाला पर्यटन क्षेत्रात उतरविण्याचा निर्णय राज्याच्या जलसंपदा विभागाने घेतला आहे.
सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर उजनी धरणाच्या पायथ्याशी आकर्षक उद्यान आणि पर्यटनस्थळ उभारण्याचा मोह जलसंपदा खात्याला झाला असून त्यासाठी खात्याने हालचाली सुरू केल्या आहेत. सन १९६८ मध्ये उजनी धरणाच्या प्रत्यक्ष बांधकामास प्रारंभ झाला आणि सन १९८0 मध्ये धरण पूर्णत्वास आले. भीमानगर परिसरात उजनी धरणासाठी मुबलक प्रमाणात जमीन संपादित करण्यात आली आहे.
धरणाचे काम पूर्ण झाल्याने धरणाखाली बाजूला जमीन शिल्लक आहे. आधी उजनी धरणाशेजारी पर्यटनस्थळ उभारणीसाठी पब्लिक-प्रायव्हेट पार्टिसिपेशन (पीपीपी) तत्त्वावर खासगी विकासकाची मदत घेण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे होता. त्यासाठी खात्याने तांत्रिक सल्लागाराची नियुक्तीदेखील केली होती, परंतु महामंडळाची आर्थिक स्थिती आणि जलसिंचन विभागाचा कथित घोटाळा, यामुळे एकही विकासक पुढे आला नाही. अखेर महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाकडे हा प्रस्ताव देण्यात आला.
पर्यटकांना आकर्षित करण्याची संधी- सोलापूर जिल्ह्यात अनेक धार्मिक स्थळे असून त्यासाठी राज्यभरातून भाविक येत असतात. पर्यटनाच्या दृष्टीने सोलापूर जिल्हा अनुकूल आहे. धरण परिसरात पाण्याची कमतरता नाही. त्यामुळे वृंदावन गार्डन (बंगळुरू), संत ज्ञानेश्वर उद्यान (पैठण) च्या धर्तीवर आकर्षक उद्यान, सुंदर देखावे, रंगीबेरंगी कारंजे उभारण्यास वाव आहे. सध्या उजनी धरण पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते. त्यात नवीन पर्यटन केंद्र उभारल्यास पर्यटकांची संख्या वाढेल. महसुलात वाढ होईल, अशी स्थिती आहे.
अधिकाºयांच्या पथकाकडून पाहणी- नियोजित पर्यटनस्थळाच्या जागेची राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकाºयांनी दोन महिन्यांपूर्वी पाहणी केली आहे. त्यांचा अहवाल कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे सादर होणार आहे. त्यांच्या छाननीनंतर हा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे पाठवला जाईल, अशी माहिती महामंडळाच्या अधिकाºयांकडून देण्यात आली.
भीमा नदीच्या उजव्या बाजूची ४३.२६ हेक्टर जमीन- भीमा नदीच्या उजव्या बाजूची ४३.२६ हेक्टर जमीन फळबाग व उद्यान विकसित करण्यासाठी मूळ प्रकल्पात आरक्षित करण्यात आली आहे. धरण प्रकल्प विकास विभागाने पैठणच्या धर्तीवर या जागी उद्यान विकसित करण्याचा प्रस्ताव सिंचन व्यवस्थापनाकडे दिला होता. कृष्णा खोरे विकास महामंडळाने हे पर्यटनस्थळ विकसित करावे, असा हा प्रस्ताव होता; मात्र महामंडळाकडे निधीची तरतूद नसल्याने त्याकडे दुर्लक्ष झाले.