सोलापूर : शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी महापालिकेने उजनी धरणातून बुधवारी तिबार पंपिंग सुरू केले. इतिहासात पहिल्यांदाच तिबार पंपिंग करण्याची वेळ आली आहे.
उजनी धरणात सध्या उणे ५० टक्क्यांपेक्षा कमी पाणी आहे. धरणाची पाणी पातळी उणे ३५ टक्क्यांखाली गेल्यानंतर महापालिकेने उजनी पंपगृहासाठी दुबार पंपिंग सुरू केले होते. दुबार पंपिंगसाठी धरण काठावरील पंपगृहापासून १०० मीटर आत पंपिंग यंत्रणा उभारली जाते. यादरम्यान उजनी धरणातून औज बंधाºयासाठी पाणी सोडण्यात आले. त्यामुळे उजनीच्या पाणी पातळीत आणखी घट झाली. दुबार पंपिंगच्या उपशावर परिणाम झाला. महापालिकेने आणखी २०० मीटर आत जाऊन पाणी उपसा करण्याचा निर्णय घेतला.
त्यासाठी पॅनेरियल कंपनीमार्फत भाडेतत्त्वावर पंपिंगची यंत्रणा उभारण्यात आली आहे. या ठिकाणी ६० अश्वशक्तीचे दहा पंप लावण्यात आले आहेत. यातील आठ पंप दररोज पाणी उपसा करुन थेट पंपगृहाच्या चारीत टाकतील. दररोज ८० एमएलडी पाणी उपसा करुन देण्याचे बंधन या कंपनीला घालण्यात आले आहे.
महापालिकेच्या इतिहासात प्रथम तिबार पंपिंग करण्याची वेळ आली आहे. यापूर्वी केवळ चार वेळा दुबार पंपिंग करण्यात आले होते. आता चांगला पाऊस होऊन उजनी धरणात चांगले पाणी येईपर्यंत तिबार पंपिंगचे काम सुरू राहणार आहे.
आयुक्तांच्या उपस्थितीत झाली चाचणी - मनपा आयुक्त दीपक तावरे, पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख गंगाधर दुलंगे, पाणी पुरवठा उपअभियंता संजय धनशेट्टी, मनोज यलगुलवार यांच्या उपस्थितीत धरण काठावर बुधवारी तिबार पंपिंगच्या कामाची चाचणी घेण्यात आली. बुधवारी सायंकाळपासून एक-एक पंप चालू होईल. दोन दिवसांत पूर्ण क्षमतेने पाणी उपसा होईल, असेही यावेळी सांगण्यात आले.