सोलापूर : शहरातील पार्क चौक येथून सिध्देश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता दुरुस्त करण्यात येत आहे. या ठिकाणी अनेक तिबेटी निर्वासित कपडे विकण्याचा व्यवसाय करतात. यंदा रस्ता दुरुस्त करण्यात येत असल्याने येथे दुकान सुरु करायला आणखी वेळ लागण्याची शक्यता आहे. यामुळे तिबेटी निर्वासितांना रस्ता दुरुस्त होईपर्यंत प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
पार्क चौक येथे तिबेटी निर्वासितांची दुकाने जून महिण्यात सुरु होत असतात. जून महिन्यात पावसाला सुरुवात होत असल्याने येथे रेनकोटची विक्री होत असते. पावसाळा झाल्यानंतर थंडी सुरु होते. त्यावेळी या दुकानातून स्वेटर विकली जातात. शहरात इतर ठिकाणी मिळणाºया रेनकोट व स्वेटरच्या तुलनेने तिबेटी दुकानकारांकडे स्वस्त मिळतात. यामुळे सोलापूरकर इतर दुकानांपेक्षा तिबेटी निर्वासितांच्या दुकानातून खरेदी करण्याला प्राधान्य देतात.
पार्क चौक येथील दुकानात रेनकोट २५० रुपये ते ५०० रुपये दरम्यान मिळतात. जसे कपडे विकले जातील तसे दुकानासाठी पुन्हा माल घेत असल्याच एका व्यवसाइकाने सांगितले. तसेच महापालिकेने रस्ता दुरुस्तीचे काम लवकर संपवावे यासाठी महापालिका आयुक्तांना भेटून विनंती केली असल्याचे एका तिबेटी निर्वासिताने सांगितले.
हुबळी येथे तिबेटी निर्वासितांची छावणी - तिबेटी निर्वासित हे कर्नाटकातील हुबळी येथील छावणीत राहतात. व्यवसायानिमित्त ते वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात. असेच काही तिबेटी निर्वासित सोलापुरात व्यवसायानिमित्त रहात आहेत. दरवर्षीप्रमाणे काही तिबेटी निर्वासित हे हुुबळी येथील छावणीमधून व्यवसायासाठी सोलापुरात दाखल झाले. मात्र, त्यांच्या दुकानासमोर रस्त्याचे काम सुरु असल्याने ते चिंतीत होते. त्यातील बहुतांश जण हे आपल्या गावाकडे परत गेले आहेत.
जेसीबी चालकाकडे चौकशी- हुबळी येथून सोलापुरात आल्यावर काही तिबेटी निर्वासितांनी आपल्या दुकानाकडे गेले. तिथे गेल्यावर त्यांना रस्ता दुरुस्तीचे काम सुरु असल्याचे दिसल्यावर त्यांनी जेसीबी चालकाकडे काम कधी संपणार याची चौकशी केली. यानंतर जेसीबी चालकाने लवकरच काम संपेल असे सांगितले. असेच काम करत राहा म्हणजे लवकर रस्ता सुरु होईल अशी अपेक्षी तिबेटी निर्वासिताने जेसीबी चालकाकाकडे व्यक्त केली.
मे महिण्याच्या शेवटी किंवा जून महिण्याच्या सुरुवातीला आमच्या दुकानाची सुरुवात होते. यंदा पार्क चौक परिसरात रस्ता दुरुस्तीचे काम सुरु असल्याने दुकान सुरु करण्यास उशीर होईल. प्रशासनाने रस्ता दुरुस्त करण्याचे चांगले काम हाती घेतले आहे. शहराच्या विकासासाठी हे आवश्यक आहे. हे काम लवकर झाल्यास आम्हाला दुकान सुरु करता येणार आहे, याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. - टेनझीन, स्वेटर-रेनकोट विक्रेता, पार्क चौक